देवेंद्र फडणवीसांकडून संयम कसा राखावा हे शिकण्यासारखं – पंकजा मुंडें

मुंबई : १९ डिसेंबर – भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा कमी होत असल्याचं चित्र आहे. यामागाचं कारण म्हणजे पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. आष्टीत नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांकडून संयम कसा राखावा हे शिकण्यासारखं असल्याचं म्हटलं आहे. पंकजा मुंडेंच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.
प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या संयमाचं कौतुक करताना सांगितलं की, “काही लोक फडणवीसांकडे जागा वाटपासाठी गेले होते. ५०-५० टक्के जागा मागत होते. त्यावेळी फडणवीसांनी संयम दाखवला. त्यांच्याकडून संयम शिकण्यासारखा आहे”. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “यावेळी मी एक फॉर्म्युला दिला. मी म्हटलं ५० टक्के जागा दिल्या तर समोरच्याच विजय होत असतो. एकाला आष्टीत आणि दुसऱ्याला पाटोद्यात उभं करा. शिरुरमध्येही युती करा, असं मी सुचवलं”.
विशेष म्हणजे काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमातही देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकत्र होते. यावेळी दोघेही मनमोकळेपणाने गप्पा मारत होते. त्यानंतर पंकजा मुंडेंनी फडणवीसांच्या संयमीपणाचं कौतुक केलं असल्याने त्यांच्यातील अंतर कमी होत असल्याचं बोललं जात आहे.
“मी गोपीनाथ मुंडेंची कन्या आहे. त्यांनी मला बेरजेचे राजकारण शिकविले. मात्र येथे बीड जिल्ह्यात गुणाकाराचे राजकारण शिकले. बीड जिल्ह्याचे रस्ते बघता बघता मला मणक्याचा आजार झाला,” असं सांगत त्यांनी टीका केली.
“दोन वर्षात एखादा रस्ता मिळालेला नाही. दोन वर्षात कोणताही निधी मिळाली नाही. नवीन कामाचा एखादा नारळ फुटला का? तुमच्या लेकीने दिलेल्या बजेटच्या कामाचे नारळ फक्त फुटले आहेत. पण तुम्ही काळजी करु नका. लोक म्हणतील भाजपाचं नाही तर आघाडीचं सरकार आहे. पण आघाडीचं सरकार असलं तरी केंद्रात तुमची लेक हक्काने निधी आणण्यासाठी बसली आहे. निधीची कमतरता कमी पडू देणार नाही,” असं पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितलं.

Leave a Reply