मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

मनातली भावना

माणूस म्हटले की भावना व्यक्त करणे आलेच कारण मन आहे म्हणजे प्रत्येक क्षणाला ते व्यक्त होत राहणार आणि ह्या व्यक्त होण्यालाच कदाचित भावना म्हणत असावेत. अश्या प्रत्येक भावना आपण सर्वांशी शेयर करत नाही किंबहुना करु शकत नाही पण काही व्यक्ती आपल्या आयुष्यात इमोशनल लेवल वर फर्स्ट प्रायोरिटी असल्याने वरील नियमांस हक्काचा अपवाद असतात. म्हणजे कुठलीही गोष्ट घडली की आधी आपल्याला तिला सांगायची असते, नाही सांगितलं तर आपण बेचैन होतो. ती गोष्ट महत्वाची असो किंवा नसो पण आपल्याला ती सांगायची असते, ती सांगताना आपल्या चेहेऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो.
ती व्यक्ती आपल्यासाठी सगळं काही असते अगदी झोपेतून उठलं तरी आपल्याला काहीतरी बोलायचं असत, अगदीच निरर्थक आणि वायफळ बडबड करायची असते आणि हे नातं खूप सुंदर असतं. कधी ते निखळ मैत्रीचं असतं तर कधी एकनिष्ठ प्रेमाचे !

पण ह्या नात्यात गल्लत तेव्हा होते जेव्हा आपल्याला वाटायला लागतं की त्या व्यक्तीसाठी आपण पण फर्स्ट प्रायोरिटी असायला हवं. ही भावना नकळत तयार होते आणि रुजत जाते. एखादी साधी वाटणारी गोष्ट आपल्याला खूप महत्त्वाची वाटायला लागते .आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि ह्यातून तयार होतात ते फक्त गैरसमज. आणि उगिचच माझ्यात आणि तिच्यात एक दरी निर्माण होते. अपेक्षांच्या ह्या दरीत मग संशयाचे धुके अलगद पसरु लागते आणि प्रत्येक सूर्योदयासहित परकेपणाचे दवबिंदु मनाच्या हळव्या कोपऱ्यात अविरत साचु लागतात… दुःखांचा डोह बनण्यासाठी !

जास्त करून हा प्रकार स्त्रीयांमध्ये पत्नी / प्रेयसी / गर्ल फ्रेंड अश्या कुठल्याही नात्याच्या बाबतीत होवू शकतो किंबहुना अनेकदा होतोच.. कारण त्यांना सगळंच सांगायचं असत ..मनात राहीलं तर घुसमट होते.. डोह बनण्याच्या क्रियेत संतत भरच पड़त राहते ! खरे तर ह्या क्षणाला गरज असते त्या साचलेल्या डोहाला प्रवाहीत्व देण्याची… मनातल्या साऱ्या भावना पुन्हा एकदा हक्काने आपल्या जीवलगाशी मनमोकळेपणाने शेयर करण्याची.

तुम्ही “त्या”ची फर्स्ट प्रायोरिटी नक्कीच आहात आणि कायम असणार हां विश्वासाचा निर्झर मनात सतत प्रवाही ठेवला की दुःखांचा डोह अस्तित्वहीन कल्पना फक्त राहील. मला तुझी गरज आहे हे जर “त्या”चे अव्यक्त मनोगत समजून घेतलं तर मुळात सुंदर असलेलं नातं कायमच सुंदर राहील…. दोघांच्या सांमजस्याने आणि प्रेमळ प्रयासाने !

पल्लवी उधोजी

Leave a Reply