आईच्या मृत्यूमुळे निराश तरुणाने घेतली तलावात उडी, पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

नागपूर : १३ डिसेंबर – आईच्या मृत्यूमुळे नैराश्यात गेलेल्या एका तरुणाने तलावात उडी घेतली. सुदैवाने याचवेळी या तलावावर एका आत्महत्येचा पंचनामा सुरू होता. तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला हा युवक पाण्यात बुडताना दिसला. त्याने जिवाची पर्वा न करता तलावात उडी घेत या तरुणाचे प्राण वाचविले. ही घटना सकाळी ९ वाजताच्या सुमारास अंबाझरी तलाव येथे घडली.
हर्ष राजेश मेंढे (२०, मिलिंदनगर, पाचपावली) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलिस कर्मचारी प्रशांत गायधने आणि जलतरणपटू युवक देवीदास जांभुळकर (चंद्रमणीनगर) या दोघांनी हर्षचा जीव वाचविला. हर्ष दहावी नापास असून त्याला बहीण आहे. ती सध्या पुण्याला शिक्षण घेते आहे. त्याचे वडील वाहनचालक आहेत. ४ नोव्हेंबर २०२१ला झालेल्या एका अपघातात त्याच्या आईचा मृत्यू झाला. हा अपघात घडला तेव्हा हर्ष तेथेच होता. आपल्या जन्मदात्रीला अखेरचे श्वास मोजताना त्याने बघितले. या घटनेचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. तो नैराश्यात गेला. रात्री तो त्याच्या वडिलांसोबत घरी झोपला होता. रात्री उशिरा वडील उठले असता हर्ष घरात नसल्याने त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शोधाशोध केली. मात्र, तो कुठेही दिसला नाही.
सकाळी ८.५० च्या सुमारास अंबाझरी तलावात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगत होता. ही माहिती मिळताच अंबाझरीचे पोलिस शिपाई प्रशांत गायधने पंचनाम्यासाठी घटनास्थळी गेले. यावेळी अंबाझरी तलावाच्या पंप हाउसजवळून हर्षने तलावात उडी घेतली. ही बाब गायधनेंच्या लक्षात आली. त्यांनी थेट तलावात उडी घेतली. याचवेळी तलावावर फिरायला आलेला अन्य एक युवक देवीदास जांभुळकर (चंद्रमणीनगर) यानेही पाण्यात उडी घेतली. दोघांनी हर्षला तलावातून बाहेर काढले. काही काळानंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांना घटनास्थळी बोलविले. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजल्यावर अंबाझरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक बागुल यांनी त्याचे समुपदेशन केले व वडिलांच्या ताब्यात दिले.

Leave a Reply