अपक्ष उमेदवाराला माझाही १०० टक्के पाठिंबा – छोटू भोयर

नागपूर : १० डिसेंबर – विधानपरिषद निवडणुकीला काही तास शिल्लक असतानाच काँग्रेसने नागपुरात सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. काँग्रेसने ऐनवेळी डॉ. रविंद्र भोयर उर्फ छोटू भोयर यांना दिलेली उमेदवारी मागे घेत, अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांनी पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसने पत्रक काढून ही घोषणा केली. निवडणुकीच्या फक्त एक दिवस आधी काँग्रेसने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत असताना दुसकीकडे छोटू भोयर यांनाही याबाबत कल्पना नव्हती अशी माहिती आहे. दरम्यान त्यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण निवडणूक लढवण्यासाठी असमर्थता दर्शवली नव्हती असं स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जो निर्णय असेल त्याच्या मागे कालही उभा होतो आणि आजही आहे. अपक्ष उमेदवाराला माझाही १०० टक्के पाठिंबा आहे,” असं छोटू भोयर यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी प्रदेशाध्यक्षांचा उमेदवार नव्हतो. मी काँग्रेसतर्फे महाविकास आघाडीचा उमेदवार होतो. पण पक्षाने जो निर्णय घेतला त्याचं मी समर्थन केलं आहे,” असं सांगत छोटू भोयर यांनी आपण नाराज नसल्याचं म्हटलं.
दरम्यान काँग्रेसने पत्रात छोटू भोयर यांनी निवडणूक लढवण्यासाठी असमर्थता दर्शविल्याचं म्हटलं आहे. त्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी असमर्थ आहे असं कधीही म्हटलं नाही. त्यामुळे पक्षाने जो निर्णय घेत आहे त्याच्याशी मी बांधील आहे”. यावेळी त्यांनी पत्रावर माझी सही आहे का? अशी विचारणा केली. मी रात्री ७.३० वाजता पत्र मिळेपर्यंत कोणतीही असमर्थता दर्शवली नव्हती असा पुनरुच्चार यावेळी त्यांनी केला.
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षातर्फे डॉ. रविंद्र भोयर यांना उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी उद्या १० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. मात्र, आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. रविंद्र भोयर यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी असमर्थता दर्शविल्याचे समजते. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मान्यतेने तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांना काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. तरी या निवडणुकीतील मतदान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या संदर्भात माहिती देण्यात यावी.” , असं काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटलेलं आहे.

Leave a Reply