राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून ७ तास चौकशी

मुंबई : ८ डिसेंबर – महाराष्ट्र विकास आघाडीचे अनेक मंत्र्यांवर ईडी चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. त्यात आता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी मंगळवार (७ डिसेंबर) रोजी ७ तास चौकशी झाली. प्राजक्त तनपुरे यांनी लिलावात घेतलेला अहमदनगर येथील साखर कारखान्यात गैरव्यवहार झाला असल्याच्या संशयावरून ईडीकडून चौकशी सुरू आहे.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी २०१२ मध्ये महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेमधून लिलावाच्या माध्यमातून साखर कारखाना खरेदी केला होता. हा साखर कारखाना १३ कोटीमध्ये खरेदी करण्यात आला होता. मात्र, या साखर कारखान्याची मूळ किंमत २६ कोटी होती. राज्यमंत्री तनपुरे यांनी १३ कोटींमध्ये हा कारखाना खरेदी केला होता. त्यामुळे या प्रकरणात काही संशयास्पद व्यवहार झाला असल्याचा ईडीला संशय आहे. त्याबाबत चौकशीसाठी प्राजक्त तनपुरे यांना ईडीला कार्यालयात बोलाविण्यात आले होते.
ईडीने मला आज दुपारी १ वाजता बोलावले होते. मात्र, ईडीचे अधिकारी इतर कामात व्यस्त होते. त्यामुळे 3 वाजता माझी चौकशी सुरू करण्यात आली. जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे ईडीला लेखी स्वरूपात देण्यात आली आहेत. काही तांत्रिक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वेळ मागितला आहे. ईडी पुन्हा कॉल करेल तेव्हा, हजर होईल आणि तपासात सहकार्य करेल असं प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

Leave a Reply