व्यसनी तरुणाचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू , चौकशीकरिता सीआयडीला पत्र

नागपूर : ८ डिसेंबर – घरगुती वादातून आईला मारहाण करून तो पोलिस ठाण्यात पोहचला. पोलिस ठाण्याच्या दाराजवळ येऊन अचानक तो कोसळला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. सदर प्रकरण हे कस्टडी डेथचे असल्यामुळे या प्रकरणी चौकशीकरिता सीआयडीला पत्र लिहिले असून, लवकरच सीआयडी या प्रकरणाचा तपास सुरू करण्याची शक्यता आहे. रवी मोहनलाल पारधी (वय ३८) असे मृताचे नाव आहे.
रवी हा प्लंबरचे काम करीत होता. त्याला गांजाचेही व्यसन जडले होते. कपिलनगर येथील जोशी उद्यानाजवळ वास्तव्याला असलेला रवी हा अनेकदा कामावरच जात नसल्याचे सांगण्यात येते. कामावर पैसे मिळाल्यावर तो हे पैसे व्यसनात खर्च करून टाकायचा. व्यसनच्या आहारी गेलेला रवी व्यसनानंतर कुटुंबातील सदस्यांसह वृद्ध आई-वडिलांनाही मारहाण करीत होता. दरम्यान, सोमवारी तो दारूच्या नशेत घरी पोहोचला. तर्र नशेत असल्याने त्याला कुठलेच भान नव्हते. त्याने यावेळी त्याच्या वृद्ध आईला पाईपने मारहाण केली व घराबाहेर पडला आणि थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याचे कुटुंबीयदेखील या ठिकाणी पोहोचले. यावेळी रवी रडायला लागला आणि त्याने त्याच्या आईला मारहाण केल्याचे पोलिसांना सांगत होता. रवीला नशेत भान नसल्यामुळे तो येथे आरडा-ओरड करू लागल्याने त्याला पोलिसांनी आवरले. दरम्यान, ओरडत रवी पोलिस ठाण्याच्या बाहेर जात असताना दारातच कोसळला. दरम्यान, त्याला उपचारासाठी मेयोत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply