वेगळा विदर्भ… कां…? या विषयावर पंचनामाची व्हिडीओ मालिका उद्यापासून होणार प्रसारित, चर्चेचे आवाहन

नागपूर : ६ डिसेंबर – ३० नोव्हेंबर २०२१ रोजी देशाचे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात वेगळ्या विदर्भाचा कोणताही प्रस्ताव केंद्र शासनाकडे नसल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक विदर्भवादी निश्चितच दुखावले आहेत. आज जरी या वक्तव्याचे पडसाद उमटलेले दिसलेले नसले तरी सुप्त नाराजी दिसत आहे. ही नाराजी केव्हाही बाहेर पडू शकेल ही शक्यता नाकारता येत नाही.
हा मुद्दा लक्षात घेत पंचनामा न्यूज पोर्टल आणि युट्युब चॅनलने वेगळा विदर्भ… कां…? या विषयावर एक व्हिडीओ मालिका मंगळवार दि. ७ डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचनामाचे मुख्य संपादक ज्येष्ठ पत्रकार आणि विदर्भाची चळवळ तसेच विदर्भाचा अनुशेष या विषयाचे अभ्यासक अविनाश पाठक हे या व्हिडीओ मालिकेत वेगळ्या विदर्भाची मागणी, त्या संदर्भातील राजकारण आणि विदर्भाचे झालेले नफा-नुकसान याचा आढावा घेणार आहेत. हे व्हिडीओ पंचनामा न्यूज पोर्टलचे संकेतस्थळ https://www.panchanama.com आणि युट्युब चॅनलचे संकेतस्थळ https://www.youtube.com/c/PANCHANAMA यावर बघता येणार आहेत. याशिवाय या व्हिडीओजची लिंक दररोज समाजमाध्यमांवरून प्रसारित केली जाईल.
या संदर्भात व्हिडीओ बघितल्यानंतर कुणाला आपली मते मांडायची असतील तर त्याचेही स्वागत आहे. आपले व्हिडीओ पंचनामा युट्युब चॅनल निश्चित प्रसारित करेल याची खात्री बाळगावी, या संदर्भात इच्छुक अभ्यासकांनी भ्रमणध्वनी क्र. ९०२९६०५०५८१, ९८९००१९३८३ वर संपर्क साधावा असे आवाहन पंचनामाने केले आहे.

Leave a Reply