पुढचे लक्ष्य ऑलिम्पिक २०२४ – अल्फीया पठाण

नागपूर : २७ एप्रिल – पोलंडच्या किलसेमध्ये सुरू असलेल्या विश्‍व चॅम्पियनशीपमध्ये भारताकडून नागपूरच्या महिला बॉक्सर अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावून देश आणि नागपूर नगरीचे नाव उंचावले आहे. आज दिल्ली येथून रेल्वेने तिचे नागपूर रेल्वेस्थानकावर आगमन झाले. या आगमनप्रसंगी नागपूर नगरीचे प्रथम नागरिक महापौर दयाशंकर तिवारी, मनपा क्रीडा समितीचे सभापती प्रमोद तभाने यांनी अल्फिया पठाण हिचे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
पत्रकारांशी बोलताना अल्फिया पठाण हिने सांगितले की, या यशाचे श्रेय वडील, आई, भाऊ आणि प्रशिक्षक गणेश यांना जाते. यानंतर ती वर्ष २0२४ ला होणार्‍या ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयारी करणार आहे. त्यांनी नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांचे आभार मानले. तसेच नागपूर बॉक्सिंग असोसिएशन यांच्याप्रतीसुद्धा आभार व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना अल्फिया म्हणाली, पोलंडच्या खेळाडूंसोबत झालेली उपांत्यफेरी फारच कठीण होती. मात्र, उत्तम सराव आणि जिद्दीच्या भरवशावर ही फेरी लिलया पार केली. अल्फियाचे प्रशिक्षक गणेश पुरोहित यांनी सांगितले की, सगळे सामने फार आव्हानात्मक होते. अल्फिया हिने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे सामने जिंकले. महापौरांनी अल्फिया पठाणचे अभिनंदन केले. ते म्हणाले, नागपुरातून बॉक्सिंगची प्रॅक्टिस करणारी अल्फिया पठाण यांनी सुवर्ण पदक जिंकून संपूर्ण जगात नागपूरचा नावलौकिक वाढविला आहे. आता ती ऑलम्पिकमध्ये पदक पटकावेल, अशी मी आशा बाळगतो. यावेळी अल्फिया पठाणचे बॉक्सिंग प्रशिक्षक गणेश पुरोहित आणि अल्फिया पठाणचे वडील अक्रमखान पठाण यांचेसुद्धा स्वागत व अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी मनपा क्रीडा विभागाचे नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, क्रीडा अधिकारी पीयूष अंबुलकर उपस्थित होते.

Leave a Reply