ऑक्सिजन निर्मितीसाठी बसविण्यात आलेले प्रकल्प तत्काळ सुरू करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

नागपूर : ३ डिसेंबर – कोविडच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे ऑक्सिजन निर्मितीसाठी बसविण्यात आलेले प्रकल्प तत्काळ सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिले.
कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांसोबतच ऑक्सिजनच्या उपलब्धतेसंदर्भात मेयो, मेडिकल येथे प्रत्येकी दोन तर ‘एम्स’मध्ये चार पीएसए प्लांट सुरू करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना तसेच इतर योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी येणार्या अडचणी संदर्भात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी आर. विमला यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच अपूर्ण कामे येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी दिले. ‘मेयो’च्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे, डॉ. वैशाली शेलगावकर, ‘मेडिकल’चे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, ‘एम्स’च्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत पाटील, राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे अतिरिक्त संचालक डॉ. कृष्णा तिरमनकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर आदी पाहणी दौर्यात उपस्थित होते.
मेडिकलमध्ये दोन ऑक्सिजन निर्मिती प्लांट बसविण्यात आले असून यासाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठा दहा डिसेंबरपूर्वी करावा. ऑक्सिजन निर्मिती प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला १६ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्याआधी सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभागाने आवश्यक बांधकाम व विद्युत जोडणी पूर्ण करावी. ऑक्सिजन प्लांटच्या देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कार्यवाही करावी. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या बायोमेडिकल अभियंत्याच्या सेवा घेण्याबाबतही प्रस्ताव तयार करावा, असेही विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले. एम्समध्ये बसविण्यात आलेल्या चार ऑक्सिजन निर्मिती प्लांटची पाहणी विभागीय आयुक्तांनी केली. ऑक्सिजन निर्मितीसाठी येणार्या अडचणी सोडविण्यासंदर्भात ‘एम्स’च्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्यासोबत चर्चा केली. मेयो, मेडिकल तसेच एम्समध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दर आठवड्याला ऑक्सिजनचे ऑडिट करा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

Leave a Reply