हिंगोलीत शेतकऱ्याने हळदीच्या पिकात केली गांजाची लागवड, ७६ किलो गांजासह शेतकऱ्याला अटक

हिंगोली : २ डिसेंबर – वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात एका शेतकऱ्याने थेट हळदीच्या पिकात अंतर पीक म्हणून गांजाची लागवड केल्याची धक्कादायक घटना हट्टा पोलिसांच्या छाप्यात उघड झाली आहे. शेतकऱ्याकडून ६.६९ लाख रुपयांचा ७६.६९ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उत्तम मारोतराव भालेराव ( वय ५५ रा. गुंडा. ता. वसमत ) असे आरोपी शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी भालेराव याने आपल्या हळदीच्या शेतामध्ये गांजाची लागवड केली होती. याची गोपनीय माहिती हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांना कळताच पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मोरे, पठाण, अरविंद गजभार आदींनी भालेराव यांचे शेत गाठून या ठिकाणी छापा टाकून ६ लाख ६९ हजार रुपयांची ७६.६९ किलोची गांज्याची 143 झाडे जप्त केली आहे. या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply