गडचिरोलीत ५ कासव जप्त, ४ आरोपी अटकेत

गडचिरोली : २ डिसेंबर – आलापल्ली वनविभागातील आलापल्ली परिक्षेत्रामध्ये गडचिरोली जिल्ह्याचे वनसंरक्षक किशोर मानकर, उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलीया व उपविभागीय वनाधिकारी नितेश शंकर देवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आलापल्ली वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी हे रात्र गस्त करीत असतांना त्यांना कक्ष क्रमांक ८१ मध्ये दोन दुचाकीवर चार इसम संशयास्पद हालचाली करतांना आढळले. गस्ती पथकाने त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील अनुसुची १ मधील भाग २ मध्ये सुचीबंध्द असलेले शिकार व विनापरवानगी वाहतुकीस प्रतीबंधीत असलेले ५ कासव प्रजातीचे वन्यजीव आढळले. त्यासोबत २२ खेकडे, २ दुचाकी, ३ टार्च व मासे पकडण्याची जाळी इत्यादी साहित्य मिळाले. आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीमध्ये रामपद लक्ष्मण हलदर, गोपाल ललीत बाईन, फटीक देवेंद्र मंडल, नित्यानंद मनोहर हलदर सर्व रा. हरीनगर ता. मुलचेरा यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधीनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४८, ४९, ४९अ, व जैवविविधता अधीनियम २००२ मधील कलम ५६ नुसार वनगुन्हा क्रमांक ०८१०४/०८ नोंदवीन्यात आला आहे. आरोपींना न्यायालय अहेरी यांच्या समक्ष हजर केले असता कंडिशनल बेसवर बेल देण्यात आली. सदर प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलीया व उपविभागीय वनाधिकारी नितेश शंकर देवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर हे करीत आहेत. कासव हे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणी नंतर त्याच्या नैसर्गिक अधीवासात सोडण्यात येणार आहे.

Leave a Reply