१ डिसेंबरपासून शाळा सुरु होणारच

मुंबई : २९ नोव्हेंबर – ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा नेमक्या कधी सुरु होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता राज्यातील शाळा येत्या १ डिसेंबरपासूनच सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी व महापालिका हद्दीतील इयत्ता १ ली ते ७ वीचे वर्ग १ डिसेंबपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे या शासन निर्णयात सांगण्यात आले आहे. तसेच शाळा सुरु करताना नेमकी कोणती खरबदारी घ्यावी, यासाठी राज्य सरकारने नियमावलीदेखील जारी केली आहे.
शाळा 1 डिसेंबरपासूनच सुरु होणार
सध्या ओमिक्रॉन या कोरोनच्या नव्या रुपाचा सर्वांनीच धसका घेतलाय. या विषाणूविरोधात लढण्यासाठी जगभरात वेगवेगळे निर्बंध घातले जात आहेत. राज्य सरकारनेदेखील आरोग्य विभागाला सूचना दिलेल्या आहेत. याआधी राज्य सरकारने राज्यातील शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु होणार असे जाहीर केले होते. मात्र ओमिक्रॉन विषाणूमुळे शाळा उशिराने सुरु केल्या जाणार का असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रातील ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मागील काळात निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी या शाळा १ डिसेंबर रोजीच सुरु होणार आहेत.
दरम्यान, शाळा येत्या एक डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले असले तरी काय खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेत तीन ते चार तासांपर्यंतच शिकविले जावे. या काळात शाळेत कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम, संमेलन तसेच खेळाचे आोयजन होणार नाही. शाळेत विलगीकरणाची सुविधा असायला हवी. तसेच शाळेच्या प्रशासनाने स्थानिक आरोग्य विभागाच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे, अशे या नियमावलीत सांगण्यात आले आहे. तशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Leave a Reply