भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीची घोषणा

नागपूर : २६ नोव्हेंबर – राज्य निवडणूक विभागानं गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीची घोषणा केली. या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदार २१ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे. २२ डिसेंबरला मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यासाठी १ ते ७ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. ४ व ५ डिसेंबर रोजी सुट्टी असल्यानं नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ८ डिसेंबरला होईल. मतदान २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असेल. २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. अशी अधिसूचना आज जारी करण्यात आली.
भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ क्षेत्रांत आणि त्याअंतर्गतच्या ७ पंचायत समित्यांच्या १०४ क्षेत्रांत ही निवडणूक होणार आहे. तर, गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३क्षेत्रात आणि त्याअंतर्गतच्या ८ पंचायत समित्यांच्या १०६ जागांच्या सार्वत्रिक निवडणुक्कांसाठी मतदान होणार आहे. भंडारा जिल्हा परिषद आणि तुमसर, मोहाडी, भंडारा, साकोली, लाखनी, पवनी आणि लाखांदूर या पंचायत समिती क्षेत्रांत निवडणूक होणार आहे. गोंदिया जिल्हा परिषद आणि गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, सडकअर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी या पंचायत समितींमध्ये निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
या दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादीचे हेविवेट नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे नाना पटोले यांचे नेतृत्व आहे. त्यामुळं दोघांसाठीही ही निवडणूक महत्त्वाची आहे. नाना पटोले यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जिल्हा परिषद क्षेत्रामधूनच केली होती.

Leave a Reply