केंद्रातले सत्ताधारी हे संविधान बदलू पहात आहेत – सुप्रिया सुळे

मुंबई : २६ नोव्हेंबर – संविधान हे जात नाही किंवा धर्म नाही किंवा प्रांत नाही. तो एक ग्रंथरूपातला कष्टपूर्वक घडवलेला मार्गदर्शक आहे. पण आता केंद्रातले सत्ताधारी हे संविधान बदलू पहात आहेत. त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रयत्न याच दिशेने सुरू आहेत. आज आपली जी काही ओळख आहे ती संविधानामुळे आहे. त्यामुळे संविधानात जर कुणी बदल करत असेल तर त्याचा कडाडून विरोध आपल्याला करायला हवा, असं सांगतानाच संविधान वाचलं तरच देश वाचेल. त्यामुळे आपण संपूर्ण राज्यभर संविधानाच्या संरक्षणासाठी उभं राहिलं पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केलं.
भारतीय संविधान दिनानिमित्ताने मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाने प्रदेश कार्यालयात संविधान गौरव दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. अगदी मोठं आंदोलन जरी प्रत्येकाला शक्य झालं नाही, तरी आपल्या पातळीवर आपण छोट्या छोट्या गोष्टी करून संविधानाबद्दलच्या जाणिवांबाबत जागर करू शकतो. संविधानाने मला काय दिलं यावर एक निबंध स्पर्धा आपण घेऊ शकतो. आपण व्हॉट्सअप वापरतो. त्यात दर आठवड्याला आपण संविधानाचा एखादा सुविचार फॉरवर्ड करू शकतो. राष्ट्रवादी मासिकात दर महिन्याला आपण संविधानवर एक पान देण्याचा प्रयत्न करू. अकॅडेमिकली महाराष्ट्र सरकार संविधानासाठी काय करू शकेल यावर कार्यक्रम असायला हवा. पुढील पिढ्यांमध्ये संविधानाचे महत्त्व वाढत राहील याची काळजी आपणच घ्यायला हवी. संविधानाच्या बळकटीसाठीच आपण आपली संघटना वाढवत राहूया, आणि त्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपत राहूया, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
या देशातल्या सर्वसामान्य माणसाला ज्या संविधानाने ताकद दिली त्या संविधानाचा सन्मान आपल्याला टिकवायचा आहे. या संविधानाने ही ताकद आपल्याला दिली म्हणूनच संयुक्त किसान मोर्चातल्या शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला आणि केंद्रसरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले, असं सांगतानाच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिल्याने आज ज्या संसदेत मी आपलं प्रतिनिधीत्व करते तिचं पावित्र्य टिकून आहे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी बाबासाहेबांचं इंग्रजी भाषेवरील विशेष प्रभुत्व कसं होतं. हे सांगितलं. स्वतःच्या जिद्दीने आणि अभ्यासाने पुस्तकांचे वाचन करून बाबासाहेबांनी इंग्रजी भाषेवर अप्रतिम प्रभुत्व मिळवलं होतं. आम्ही जेव्हा अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशात जातो तेव्हा तिकडचे लोक आम्हाला आवर्जून बाबासाहेबांबद्दल विचारतात. त्यांचे विचार जाणून घ्यायला उत्सुक असतात. मला तर वाटतं की भारताच्या बाहेर बाबासाहेब अधिक मोठे आहेत. मी अमेरिकेत गेले होते तेव्हा लक्षात आलं की ते जेवढं आपल्या आईवर प्रेम करतात तेवढंच संविधानावरही प्रेम करतात. त्यामुळेच या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेबांबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल परदेशातल्या लोकांना खूपच कुतुहल वाटतं, असं त्यांनी सांगितलं.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची वाटचाल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या मार्गदर्शनाने केली. त्यामुळेच शरद पवार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्द्यावर अढळ राहिले. दुर्दैवाने माझं शिक्षण औरंगाबादला झालं नाही. मलाही माझ्या सर्टिफिकेटवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं नाव पाहायला आवडलं असतं. अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वैचारिक व्यक्तिमत्व इतकं उत्तुंग आहे की ते कुठल्याही एका समाजाचे त्यांना म्हणता येणार नाही. त्यांचं योगदान ग्लोबल म्हणजे जागतिक दर्जाचं आहे. म्हणूनच संपूर्ण जग डॉ. बाबासाहेबांसमोर नतमस्तक होतं, असंही त्या म्हणाल्या.

Leave a Reply