पंतप्रधानांनी एकदा दाढी झटकली तर त्यातून ५० लाख घरं पडतात – भाजप खासदार जनार्दन मिश्र

भोपाळ : २६ नोव्हेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा दाढी झटकली तर त्यातून ५० लाख घरं पडतात, आणि दुसऱ्यांदा झटकली तर त्यातून १ कोटी घर पडतात, असं वक्तव्य मध्य प्रदेशातील भाजप खासदार महोदयांनी केलं आहे. या खासदारांचं नाव आहे जनार्दन मिश्र, ते मध्य प्रदेशातल्या रिवा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहे. जनार्दन मिश्र असेही अनेकदा चर्चेत असतात, पण आता त्यांनी केलेल्या या वक्तव्यमुळे सोशल मीडियावर ते धुमाकूळ घालत आहेत.
मध्य प्रदेशातील एका स्थानिक सभेला जनार्दन मिश्र संबोधित करत होते. त्यावेळी पंतप्रधान आवास योजनेबद्दल माहिती देताना त्यांनी त्याचा थेट संबंध मोदींच्या दाढीशी जोडून टाकला. ते म्हणाले की, ‘पीएम आवास योजना ही पंतप्रधान मोदींच्या दाढीतून बाहेर पडते, मोदींनी एकदा दाढी झटकली तर 50 लाख आणि दुसऱ्यांदा झटकली तर 1 कोटी घरं बाहेर पडतात.’ हे ऐकल्यानंतर स्थानिकांमध्ये एकच हशा पिकला.
एवढ्यावरच जनार्दन मिश्र थांबले नाहीत तर ते पुढं म्हणाले,’जोपर्यंत पंतप्रधान मोदींची दाढी राहिल, तोपर्यंत पीएम आवास योजनेचा लाभ मिळत राहिल. त्यासाठी मोदींच्या दाढीला नेहमी पाहात राहा आणि घरं मिळवत राहा.’ हे वक्तव्य चर्चेत आल्यानंतर जनार्दन मिश्र यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लोकांना समजावण्यासाठी त्यांनी मोदींच्या दाढीचं उदाहरण दिलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, विरोधकांकडून पंतप्रधान आवास योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.
जनार्दन मिश्र हे नेहमी चर्चेत राहतात. याआधी मे महिन्यात त्यांनी मध्य प्रदेशातील कोविड सेंटरचा आढावा घेतला, पाहणी दरम्यान त्यांना शौचालय अस्वच्छ दिसलं, तर त्यांनी हाताने या शौचालयाची स्वच्छता केली. शौचालय स्वच्छ करतानाचा त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.
जनार्दन मिश्र यावेळी आपल्या मतदार संघाचा आढावा घेत होते, या दरम्यान स्थानिकांनी शौचालयाची समस्या त्यांना सांगितली, हे कळाल्यानंतर ते शौचालयात पोहचले आणि कुणाला काही आदेश देण्याऐवजी हातात हँडग्लोव्हज घालून त्यांनी शौचालयाची स्वच्छता केली. शौचालयाच्या स्वच्छतेसाठी मिश्र यांनी टॉयलेट ब्रश मागितला, पण ब्रश नसल्याचं कळाल्यावर त्यांनी हातानेच शौचालयाचं भांडं स्वच्छ केलं.

Leave a Reply