सरकार झोपेचे सोंग घेऊन गरिबांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा प्रवीण दटके यांचा आरोप

नागपूर : २५ नोव्हेंबर – नागपूर सुधार प्राण्यासकडून विकास शुल्कात तीन पट केलेल्या वाढीच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आले. नागपूर सुधार प्राण्यास कार्यालयापुढे भाजप शहर अध्यक्ष तथा आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. सरकार झोपेचे सोंग घेऊन काम करत असून ते गरिबांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आमदार प्रवीण दटके यांनी केला.
यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्या आली. तसेच, भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करत मागविकास आघाडी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. वाढीव विकास शुल्काचा काळा जीआर रद्द करावा, अशीही मागणी करण्यात आली.
महाविकास आघडी सरकार झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. नागपुरात पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नागपुरातून लोकसभा निवडणूक लढले आहेत. पण, यांना सामान्य जनतेचे प्रश्न दिसत नाही. त्यांच्याशी देणे घेणे नाही, हे दुर्दैव असल्याचा आरोप आमदार प्रवीण दटके यांनी केला.
काँग्रेस सरकारने वाढवलेले विकास शुल्क ११२ केले होते. फडणवीस सरकार असताना हा शुल्क कमी करून ५६ रुपये करण्यात आले, पण आता पुन्हा त्यात तीन पट वाढ करत सामान्य नागरिकांना वेठीस धरण्यात आले आहे. ३० ते ५० रुपयांत घेतलेल्या प्लॉटवर आता १६८ रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे विकास शुल्क आणि व्याजाचा हिशोब लावल्यास २०० रुपये प्रति स्क्वेअर फूट आकारले जात आहे. ही रक्कम एका प्लॉटमधे विचार केल्यास लाखोंच्या घरात जात आहे. त्यामुळे, सामान्य गरिबानी या आर्थिक अडचणीच्या काळात पैसे कुठून भरायचे, असा सवाल उपस्थित करत आंदोलन करण्यात आले.
शहरातील विविध ठिकाणी भाजपचे आमदार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात चर्चा करून मार्ग न काढल्यास १ लाख लोकांच्या उपस्थितीत मोर्चा काढू, असा इशारा आमदार प्रवीण दटके यांनी दिला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर तसेच, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी, महिला मोर्चाचे पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी होते.

Leave a Reply