रसायनांच्या टाकीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू , तिघे जखमी

अकोला : २५ नोव्हेंबर – अकोला येथील राष्ट्रीय महामार्गावर रिधोरानजीक असलेल्या ईगल इन्फ्रा कंपनीत रसायनांच्या टाकीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. संजय पवार आणि आतीफ खान असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर पारस येथील मुशीर अहेमदसह तिघांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्गावर रिधोरा गावानजीक ईगल इन्फ्रा कंपनीचा एका शेतात हॉटमिक्स प्रकल्प आहे. या प्रकल्पात मोठ्या लोखंडी टाक्या, मिक्सर मशीनसह केमिकल असलेल्या टाक्या आहेत. कंपनीच्या आवारात केमिकलच्या टाकीजवळ वेल्डिंगचे काम सुरू होते.
वेल्डिंगची ठिणगी केमिकलच्या टाकीवर उडाल्याने या टाकीचा मोठा स्फोट झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर येथील द्रव पदार्थाच्या गळतीमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वेल्डिंगचे काम करीत असलेल्या ५ जणांपैकी दोघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी आहेत. आग लागली तेव्हा रात्रपाळीचे कामगार कामावर आले होते. घटनेनंतर कामगारांचा मोठा गोंधळ उडाला. बाहेर पडण्याच्या प्रयत्नात कामगार जखमी झाले. स्फोट झालेल्या टाकीत ५०० लिटर द्रव पदार्थ असल्याचे समजते. आगीची माहिती मिळताच अकोला मनपाच्या अग्निशमन दलाचे तीन बंब आणि दोन टँकर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही आग एवढी मोठी होती की, दूरवरून आगीचे लोट दिसत होते. या घटनेतील मृतक आसीफ खान हा पारस येथील रहिवासी असून घटनेनंतर मृताचे नातलग घटनास्थळी पोहोचून तेथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
कंपनीचा व्यवस्थापक किंवा कंत्राटदाराला बोलवा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मृताच्या नातलगांची होती. घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. राजेश्वर पुरी, पटवारी प्रशांत बुले यांच्यासह जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे, डाबकी रोड पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते.

Leave a Reply