देशात अराजक निर्माण करून मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयोग – देवेंद्र फडणवीस

मुंबई : १६ नोव्हेंबर – मालेगावमध्ये झालेली हिंसा हा एक प्रयोग होता. देशात अराजक निर्माण करून आणि मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयोग होता, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा गंभीर आरोप केला. मालेगावची घटना साधी नव्हती. हा एक प्रयोग होता. देशात अराजक माजवण्यासाठी अल्पसंख्यकांचं ध्रुवीकरण करण्यासाठी विचार करून केलेला हा प्रयोग आहे. देशात ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयोग आहे. हिंदूंची दुकाने निवडून निवडून जाळली जातात, एक तरी महाविकास आघाडीचा नेता त्यावर बोलला का? दुकान हिंदूचं असो की मुस्लिमांचं ते जाळणं चुकीचं आहे. पण एक तरी नेता बोलला का? असा सवाल फडणवीसांनी केला.
आता विचाराचा नक्षलवाद संपला आहे. आता एक नक्षल अर्थव्यवस्था तयार झाली आहे. एक रेड कॉरिडोअर तयार झाला आहे. नेपाळपासून साऊथ पर्यंत हे नेक्सस आहे. नक्षलवाद्यांकडून साहित्य सापडलं आहे. त्यातून त्यांना आयसिस आणि पाकिस्तानकडून कशी मदत मिळते हे दिसून आलं आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे, असं ते म्हणाले.
आम्ही दंगल करणारे लोक नाही. भाजप कधी दंगल करत नाही. पण आमच्या अंगावर कोणी चालून आलं तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. यापुढे आम्ही हिंदूंची दुकाने जळू देणार नाही. सरकार अशा घटनांना आशीर्वाद देणार असेल तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आज या सरकारमध्ये हर्बल तंबाखू, वसुली, स्थगिती, बदली, खंडणी यावर चर्चा होते. पण शेतकरी आणि गोरगरिबांवर चर्चा होत नाही. या सरकारच्या काळात हजारो कोटीची लूट सुरू आहे. वाटमारी सुरू आहे. पण सामान्य लोकांकडे पाहायला कुणालाही वेळ नाही. सुधीरभाऊंनी चांगला राजकीय प्रस्ताव मांडला. या सरकारचे कपडे काढले. पण सुधीर भाऊ यांचे कितीही कपडे काढले तरी या निर्लज्जांना काही फार परिणाम होतो असं नाही. त्यामुळे आता आपल्याला या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरवावेच लागेल. आता कोरोना आहे म्हणून ते आम्हाला थांबवू शकत नाही. दोन वर्ष कोरोना आहे म्हणून ते आम्हाला रोखत होते. आमच्यावर गुन्हे दाखल करत होते. पण आता ते आम्हाला रोखू शकत नाही, असा इशारा त्यांनी दिला.
आम्हाला कुणालाही घाबरण्याचं काम नाही. आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामीही नाही. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. जेव्हा वर्षातून बाहेर पडलो. तेव्हा चार महिने भाड्याच्या घरात राहिलो. स्वत:चं घर नव्हतं. त्यामुळे घाबरण्याचं काम नाही. हे भ्रष्टाचारी सरकार आहे. थेट लढाई आहे. त्यामुळे आपण नाही लढलो तर आपल्याला काळ माफ करणार नाही, असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 8 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले. त्यात त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार सुरू असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर लगेच दोन दिवसांमध्ये 11 नोव्हेंबर रोजी मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोर्चे निघाले, असा दावा त्यांनी केला. कुणाच्या ध्यानीमनी नसता इतके मोठे मोर्चे कसे काय निघतात? नियोजनाशिवाय हे मोर्चे निघणे शक्यच नाही. नियोजन झाले असेल तर सरकार, आयबी, गुप्तचर, पोलिसांनी कसे काय माहित नाही, असा सवाल त्यांनी केला. सरकारच्या समर्थनाने हे मोर्चे निघाले. हा पद्धशीरपणे पोलरयाझेशनचा प्रयोग आहे. या मोर्चामध्ये निवडून हिंदूंची दुकाने जाळली गेली. दुकान कुणाचेही जाळणे ते चुकीचेच. मात्र, या साऱ्या हिंसाचारावर महाविकास आघाडींच्या नेत्यांची तोंडे शिवली गेली. त्यात संजय राऊतांची अवस्था कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…अशी झाल्याची जहरी टीका फडणवीस यांनी केली.

Leave a Reply