अशोक पाल या विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी नागपुरातील निवासी डॉक्टर्स उद्यापासून संपावर

नागपूर : १२ नोव्हेंबर – यवतमाळमध्ये काल झालेल्या एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या हत्येचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संस्था मार्डने अशोक पाल या विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी व अश्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्य शासनाने कठोर पाऊले उचलावी म्हणून राज्य शासनासमोर काही मागण्या ठेऊन त्या पूर्ण करून घेण्यासाठी अंतवासिता डॉक्टरांनी उद्यापासून संप पुकारण्याची आवाहन केले आहे.
एमबीबीएस चा विद्यार्थी असलेल्या अशोक पाल या विद्यार्थ्यांचा यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात निर्गरून खून करण्यात आला, त्या विद्यार्थ्याला न्याय मिळावा म्हणून यवतमाळ येथील विद्यार्थी कालपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ नागपूरच्या निवासी डॉक्टरांच्या संस्थेने उद्यापासून आपत्कालीन सेवा वगळता इतर सेवा बंद करण्याचे आवाहन केले आहे.
या आंदोलनामागे त्यांच्या मागण्या अश्या की अशोक पाल या विद्यार्थ्यांच्या मारेकऱ्याला १२ तासांच्या आत अटक करण्यात यावी व राज्य शासनातर्फे अशोक पाल या विद्यार्थ्यांचा परिवाराला ५० लाखांची नुकसान भरपाई करण्यात यावी. तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकरिता प्रत्येक वार्डात सुरक्षा रक्षक असावा. रुग्णासोबत फक्त एकाच नातेवाईकाला रुग्णालयात प्रवेश दिला जावा, तसेच रुग्णाच्या नातेवाईकाला दिली जाणारी पासची कडक तपासणी केल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाऊ नये. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी व्हावी, तसेच रुग्णालयातील संपूर्ण परिसर २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत राहावा व रुग्णालय तसेच कॉलेजच्या आवारात लाईट्स लावण्यसात यावे.
या मागण्या मान्य करून येणाऱ्या काळात अश्या घटनांना आळा घालण्यात यावा म्हणून नागपुरातील निवासी डॉक्टर्स उद्यापासून आपले आंदोलन सुरु करणार आहेत.

Leave a Reply