नगराध्यक्ष पति-पत्नीवर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा दाखल

बुलडाणा : १० नोव्हेंबर – बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचे नगराध्यक्ष कासम गवळी आणि त्याच्या पत्नी माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका हसीनाबी कासम गवळी यांच्यावर बे हिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक बुलडाणा विभागाच्या पोलीस उपअधिक्षक संजय चौधरी यांनी मेहकर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमांव्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे राजकिय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
कासम गवळी आणि त्यांच्या पत्नीच्या नावे ५ कोटी ९ लाख ८८ हजार ४९५ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता मिळून आली आहे. मेहकर नगर परिषदेचे नगराध्यक्ष कासम पिरु गवळी वय ५८ वर्ष नगराध्यक्ष आणि वय ३८ वर्ष रा. दोघे गवळीपूरा मेहकर यांच्याकडे २१ डिसेंबर २००६ ते २२ सप्टेंबर २०२० या परिक्षण कालावधीमध्ये नगर परिषद, मेहकर येथे लोकसेवक नगराध्यक्ष पदावर कार्यरत असताना, त्यांच्या ज्ञात व कायदेशीर उत्पन्नापेक्षा विसंगत अशी नमूद रकमेची अपसंपदा स्वतःच्या तसेच पत्नीच्या नावे बाळगल्याबाबत ते समाधानकारक खुलासा सादर करू शकले नाहीत.
याचप्रमाणे कासम गवळी यांच्या गैरकृत्यास त्यांची पत्नी हसीनाबी गवळी यांनी रुपये ९८ लाख ४५ हजार ५१७ रुपयांची एवढी मालमत्ता ही अपसंपदा आहे. हे माहित असून देखील ती जाणीवपूर्वक स्वतःच्या नावे धारण करून ती कब्जात बाळगण्याकामी लोकसेवक नगराध्यक्ष कासम गवळी यांना सहाय्य केले आहे. या तक्रारीवरून पो. स्टे. मेहकर येथे नगराध्यक्ष कासम गवळी यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम १३(१) (ई) सहकलम १३(२), ( भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १३(१) (ब ) सहकलम १३(२) दुरुस्ती दिनांक २६/०७/२०१८ पासून ) आणि त्यांची पत्नी हसिना कासम गवळी यांचे विरुद्ध भा.द.वि. कलम १०९(भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १२ दुरुस्ती दिनांक २६/०७/२०१८ पासून) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply