भंडारा वनपरिक्षेत्रात नीलगाईची शिकार

भंडारा : १० नोव्हेंबर – लाखांदूर वनपरिक्षेत्रातील मुर्झा येथे एका निलगाईची रविवारी शिकार करण्यात आली. विजेचा करंट लावून ही शिकार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाहताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे समजते.
७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान लाखांदूर वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र दिघोरी अंतर्गत मुर्झा येथील वसंत रतीराम ठलाल यांच्या मालकीच्या शेतामध्ये शिकार केल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या आधारे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी नीलगायीचे अंदाजे १०० ते ११० किलो मास दोन प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये आढळून आले. याच ठिकाणी विद्युत प्रवाहाकरिता लागणारे साहित्यही सापडले. वन कर्मचाऱ्यांना पाहताच उपस्थितांनी तेथून पळ काढला. या प्रकरणात काही संशयीतांची नावे समोर आली असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी उप वनसंरक्षक एस.बी.भलावी यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित, लाखांदूर हे करीत आहेत.

Leave a Reply