माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात

मुंबई : ९ नोव्हेंबर – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. खंडणी प्रकरणात दोन पोलीस निरीक्षकांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाख रुपये परमबीर सिंग यांच्या सांगण्यावर घेतल्याचे समोर आले आहे.
परमबीर सिंग खंडणी प्रकरणात राज्य सरकारने SIT स्थापन केली होती. या समितीने केलेल्या चौकशी दरम्यान पुरावे आढळून आले होते. त्यानंतर स्टेट सीआयडीने दोन पोलीस निरीक्षकांना अटक केली आहे. नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहे.

आज दोघांना किला कोर्टात हजर केले. सरकारी पक्षाने दोघांची 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली आहे. या दोघांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाख रुपये घेतले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली.
सरकारी वकिलांने कोर्टात माहिती दिली की, या दोघांनी तक्रारदाराकडून पैसे घेण्याकरता हवालाचा वापर केला. परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन पैशांचा व्यवहार झाला होता. हवाला ॲापरेटर मोमिन याच्या माध्यमातून व्यवहार हा व्यवहार झाला. १० रुपयांची नोट ५० लाख रुपयांच्या हवाला व्यवहाराचा कोड होती. पीआय आशा कोरके यांनी हवाला मार्फत पैसे घेतले होते. पैशांची देवाणघेवाण होताना चॅटिंगद्वारे कन्फर्मेशन दिले होते. सरकारी वकिलांनी आता परमबीर सिंग यांच्या विरोधात अजामिन पात्र वॉरंटची मागणी केली आहे.

Leave a Reply