जे. पी. नड्डा यांचे विधान म्हणजे भाजपचे वैफल्य – संजय राऊत यांचा टोला

मुंबई : ८ नोव्हेंबर – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील सरकार उखडून फेकण्याचं आवाहन केलं आहे. नड्डा यांच्या या आव्हानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. उखडायचंच असेल तर अरुणाचल प्रदेशातून चीन आणि जम्मू-काश्मीरमधून अतिरेक्यांना उखडून फेका, असं आव्हानच संजय राऊत यांनी केला आहे. तसेच जे. पी. नड्डा यांचे विधान म्हणजे भाजपचे वैफल्य असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काल जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील सरकार उखडून फेकण्याचं आवाहन केलं होतं. त्यावरून राऊतांनी जोरदार हल्ला चढवला आहे. जेपी नड्डा सदगृहस्थ आहेत. चांगले नेते आहेत. नड्डा यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचं सरकार उखडून फेका. पण महाराष्ट्रातील सरकार उखडण्याची भाषा करण्याआधी त्यांनी अरुणाचल प्रदेशात चीनने घुसखोरी करून गावंच्या गावं वसली आहेत. ती आधी उखडून फेकावीत. जम्मू -काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. दहशत निर्माण झाली आहे. अतिरेक्यांचे अड्डे निर्माण झाले आहेत. हे अड्डे आधी उखडून फेका, असं आव्हानच राऊत यांनी दिलं.
जेपी नड्डा यांचं विधान म्हणजे भाजपचं वैफल्य असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्रात प्रयत्न करूनही भाजपला आघाडीचा बालही बाका करता आला नाही. इतकं मोठं राज्य, केंद्रीय सत्ता, संपूर्ण केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून दहशत, दबाव आणि पैसा याचा वापर करूनही सरकार पडत नसेल तर वैफल्य येणं हे स्वाभाविक आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
राजकारणात लोकशाहीत एखादं सरकार लोकशाही मार्गाने हटविण्याचा अधिकार दुसऱ्या पक्षाला आहे. पण उखडण्याची भाषा करत असाल तर सीमेवर जी लोकं घुसली आहेत आणि गावंच्या गावं बसवली आहेत, चीनने त्यांना उखडण्यासाठी काही करता येत असेल तर देश त्याविषयी समजून घ्यायला उत्सुक आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी अरुणाचलमधून चीनला आणि काश्मीरमधून अतिरेक्यांना उखडून झालं की मग भाजपने पूर्णपणे महाराष्ट्राकडे वळावं आणि राजकीय उखडबाजी जी काही आहे जरूर करावी, असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला.

Leave a Reply