शेखर सावरबांधे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेश सरचिटणीस

नागपूर : ७ नोव्हेंबर – शेखर सावरबांधे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रदेश कार्यकारिणीचं सरचिटणीसपद बहाल केलंय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी हे पत्र आज शेखर सावरबांधे यांना सुपूर्त केलंय. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा होणाराय.
शेखर सावरबांधे यांनी ऑगस्ट २०२१ रोजी शिवसेनेला सोडचिठ्टी दिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सावरबांधे हे नागपूर मनपात उपमहापौर होते. तसेच शिवसेनेचे नागपूर जिल्हाध्यक्षही होते. २००२ पासून ते शिवसेनेत होते. परंतु, गेल्या २० महिन्यांत शिवसेनेत बरेच बदल झाले. दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना शिवसेनेत महत्त्वाची पदे दिली गेली. यामुळं सावरबांधे नाराज होते. अखेर त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. काही कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला.
शेखर सावरबांधे यांना सरचिटणीसपदाचे नियुक्तीपत्र गोंदियात आज देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह जाणवत होता. जबाबदारी दिली गेल्यानं सावरबांधे हे जोमाने कामाला लागतील. याचा फायदा राष्ट्रवादीला येत्या महापालिका निवडणुकीत होईल, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिष्याची गरज नाही. २०१४ विधानसभा निवडणुकीत दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रातून त्यांना शिवसेनेकडून तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यात ते पराभूत झाले असले, तरी त्यांचा शहरात वट कायम आहे.
सावरबांधे यांनी १९९२ पासून आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली. तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी २००२ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना शहरात वाढविण्याचं काम त्यांनी केलं. पुढं शिवसेनेने त्यांना जिल्हाध्यक्षपदी दिलं. परंतु, ऐवढ्यात पक्षाबाहेरून शिवसेनेत आलेल्यांकडे शिवसेना पक्षाची सूत्र आहेत. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. म्हणूनच त्यांनी ऑगस्टमध्ये राष्ट्रवादीची वाट धरली. याचा त्यांना स्वतःला फायदा झाला. त्यामुळेच ते आता जोमानं कामाला लागून पक्षाला सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतील. काँग्रेसचेच सहकारी आता राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळं त्यांच्याशी जुळवून घेणे सोपे जाणार असल्याचं सावरबांधे म्हणाले.

Leave a Reply