मांडूळ साप देण्याचं आमिष दाखवून बुलढाण्यात कोल्हापूरच्या माजी सैनिकांची हत्या

बुलडाणा : ७ नोव्हेंबर – दोन तोंडाचा मांडूळ साप देण्याचं आमिष दाखवून कोल्हापुरातील दोघांना बुलडाण्यात बोलावून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधत संबंधित दोघांना दोन तोंडाचा मांडूळ साप देण्याचं आमिष दाखवलं. कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असणारे दोघे मांडूळ घेण्यासाठी बुलडाण्यात गेले असता, आरोपींना दोघांना जंगलात नेवून बेदम मारहाण केली आहे. यामध्ये कोल्हापुरातील एका माजी सैनिकाचा जीव गेला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे.
वृत्तानुसार, अनिल आनंदा निकम आणि माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील अशी मारहाण झालेल्या दोघांची नावं आहेत. दोघंही कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे बुद्रुक येथील रहिवासी आहेत. संबंधित दोघांना पवार नावाच्या व्यक्तीनं दोन तोंडाचा मांडून देण्याचं आमिष दाखवलं. त्यासाठी पैसे घेऊन बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा याठिकाणी बोलावलं. दोघंही नांदुरा याठिकाणी पोहोचल्यानंतर आरोपीनं दोघांना घेऊन जायला दुचाकी पाठवली. दोघांनाही वडोदा येथून तीन किमी आतमध्ये बाभळीच्या जंगलात नेलं. येथे आरोपींनी दोघांकडून १ लाख ६ हजार रुपयांची रोकड काढून घेतली.
याठिकाणी दोघांनी मांडूळ सापाची मागणी केल्यानंतर, दोघांनाही झाडाला उलटं टांगून बेदम मारहाण केली. या मारहाणी माजी सैनिक प्रल्हाद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी निकम यांच्या नातेवाईकांना फोन पेवरून काही रक्कम पाठवायला लावून एटीएममधून ही रक्कम काढून घेतली आहे. यानंतर आरोपींनी संबंधित दोघांना पूर्णा नदीच्या पुलावर आणून पुलावरून खाली फेकलं आहे.
जखमी अवस्थेत निकम यांनी अनेक लोकांना मदत मागितली. पण त्यांना कोणीही मदत केली नाही. शेवटी एका ॲम्ब्युलन्स चालकाने त्यांना उचलून नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केलं. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करत प्रल्हाद यांना मृत घोषित केलं. जखमी अनिल निकम यांच्या फिर्यादीवरून नांदोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply