जागतिक स्तरावर नागपूरचे नाव मोठे करणाऱ्या अल्फीया पठाणचे सुनील केदारांनी केले कौतुक

नागपूर : २५ एप्रिल – पोलँड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरची लेक अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावून समस्त देशाची मान उंचावली आहे, अशा शब्दात कौतुक करून अल्फियाने युवा वर्ल्ड चँपियन झाल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी तिचे अभिनंदन केले व तिच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
केदार म्हणाले, अल्फियाला शासनाकडून ३ लाख रोख रक्कम पुरस्कार देण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागाला दिले आहेत. तसेच भावी स्पर्धांच्या सरावासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणारा असल्याचे त्यांनी सांगितले. पोलंडमधील वर्ल्ड यूथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने सुवर्णपदक जिंकले आहे. अल्फिया पठाणने गुरुवारी पोलंडमधील किल्स येथे झालेल्या एआयबीए पुरुष आणि महिलांच्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत उदयोन्मुख चॅम्पियन बनली. ज्युनिअर आशियाई विजेती अल्फियाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अनुभवी असलेल्या माल्डोवाच्या डारियाला तीनही फेर्‍यामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करून पाचही पंचांना आपल्या बाजूने ५-0 अशा फरकाने निर्णय द्यायला भाग पाडून विजय प्राप्त केला. १८ वर्षांच्या अल्फियाने सुरुवातीपासूनच आक्रमण केले व प्रतिस्पर्धीला सावरूच दिले नाही. उंच व मजबूत शरिरयष्टीच्या अल्फियाने पंचेसचा वर्षाव करीत तिन्ही फेर्‍यामध्ये आपले तांत्रिक कौशल्य व शक्ती पणाला लावून आपल्या प्रतिस्पध्र्याला नामोहरम केले.

Leave a Reply