मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा – केशव उपाध्ये यांची मागणी

मुंबई : ३ नोव्हेंबर – महविकास आघाडी सरकारमधील जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या संस्थेमध्ये काम करत असलेल्या प्रतीक काळे या २७ वर्षीय तरुणाने ३० ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. या आत्महत्येस मंत्री शंकरराव गडाख जबाबदार असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला असून त्यांनी गडाख यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
प्रतीक काळे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ क्लिप तयार केली होती आणि त्या क्लिपमध्ये त्यांनी मंत्री शंकराव गडाख यांचे नाव घेतले होते. तसेच, व्हिडिओ क्लिपमध्ये त्यांनी दहा जणांची नावे घेतली होती. परंतु, त्यातील सात जणांवर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण दाबण्याचा पोलिसांवर दबाव येत असल्याचे देखील केशव उपाध्ये म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमधील कुठल्या ना कुठल्या मंत्र्याचे दररोज काही ना काही प्रकरणांमध्ये नाव समोर येत आहे, असे सांगत आता जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली.
तरुणाला न्याय द्यायचा असेल तर, शंकरराव गडाख यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी करत त्यांनी राजीनामा दिला नाही तर, मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावरून काढून टाकावे. जर, सरकारने लक्ष दिले नाही तर, आम्ही सीबीआयची मागणी करू. प्रतीक काळेवर आत्महत्या करण्याची वेळ का आली? या सर्व गोष्टी समोर यायला हव्यात, अशी मागणीही केशव उपाध्ये यांनी केली.

Leave a Reply