भाजप नेते राजीव बॅनर्जी यांचा पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

कोलकाता : १ नोव्हेंबर – पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते राजीब बॅनर्जी यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत येथील सभेत बॅनर्जी स्वगृही परतले.
ममता बॅनर्जी सरकारमध्ये राजीब हे मंत्री होते. ममतांनी सूचना करूनही त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे गेल्याच आठवडय़ात भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणूनही त्यांची निवड केली होती. भाजपची विचारसरणी तसेच द्वेषाचे राजकारण मला मान्य नाही. व्यक्तिगत आरोप करणे चुकीचे आहे, हे पक्षनेतृत्वाला नेहमीच सांगितले होते, असे राजीब यांनी स्पष्ट केले. तृणमूल काँग्रेस सोडण्यात चूक झाल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी हावडा जिल्ह्य़ातील डोमजूर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. निवडणूक निकाल लागल्यापासून ते भाजपच्या कार्यक्रमांपासून दूरच होते.
त्रिपुरामध्ये २०२३ मध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार असेल, असा दावा पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. राज्यात पश्चिम बंगालमध्ये विकास करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
भाजप सत्तेत आल्यापासून त्रिपुरात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप अभिषेक यांनी केला. भाजप सरकारने कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप बॅनर्जी यांनी केला आहे.

Leave a Reply