शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना मैदानी खेळांची आवड निर्माण करणे आवश्यक – सुनील केदार

नागपूर : ३१ ऑक्टोबर – विद्यार्थ्यांना शालेय जीवनात खेळाची आवड लागावी, याकरिता मैदानी खेळाची आवश्यक उपलब्धता निर्माण करून द्यावी. या मागे शारीरिक तंदूरुस्ती हा मुख्य उद्देश ठेवावा. स्पर्धकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी साऊथ पब्लिक स्कुल, नागपूर येथे ४ थ्या वरिष्ठ गट पुरुष व महिला तायक्वांडो स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमात क्रीडा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, अध्यक्ष सुधाकर कोहळे, उपाध्यक्ष देवेन दस्तूरे, प्रविण धांडे तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.
केदार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले स्पर्धेत जिंकण्याची भूक स्वत:मध्ये निर्माण करा. त्यामुळे शारीरिक तसेच मानसिक विकासाला चालना मिळून सुसंस्कार घडतात. तसेच देशाला स्पर्धेमार्फत योग्य युवा पिढी मिळण्यास मदत होईल.
राज्य शासनामार्फत शालेय स्तरावरच्या स्पर्धांना बळकटी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत कोरोना काळात खेळाची मैदाने बंद होती हळूहळू सर्व क्रीडाप्रकाराला सुरुवात होणार असून लवकरच महाराष्ट्रातील मैदाने बहरतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला सर्व स्पर्धा त्यांचे नियोजित टाईम टेबल, वार्षिक वेळापत्रक सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले. या आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व आयोजकांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
यावेळी डॉ. सुशांत भोयर यांच्या पुस्तकाचे विमोचन तसेच स्पर्धकांना सन्मान चिन्ह व पारितोषिक श्री. केदार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

Leave a Reply