दलितांचा हक्क हिरावून घेणाऱ्यांसोबत रामदास आठवले, याहून दुर्दैवी काही असू शकत नाही – नवाब मलिक

मुंबई : ३१ ऑक्टोबर – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरुन सुरु झालेल्या वादामध्ये अडकलेले अमली पदार्थ तपास यंत्रणेचे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि वडीलांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. याचसंदर्भात वानखेडेंवर धर्म लपवून जात प्रमाणपत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप करणारे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामदास आठवले यांनी समीर वानखेडेंची बाजू घेतल्यावरुन मलिक यांनी नाराजी व्यक्त करणारं वक्तव्य केलं आहे.
“हा सर्व विषय सामाजिक न्याय विभागाशी संबंधित आहेत. मी पत्राद्वारे यासंदर्भातील तक्रार करणार आहे. मी एकटाच तक्रार करणार नाहीय. बरेच लोक पोलीस स्थानकांमध्ये जात आहेत. तक्रार होणार हे निश्चित. आमच्या म्हणण्याने तुम्ही निष्कर्षापर्यंत जाऊ नका. जात पडताळणी समिती आहे. खोटं जातप्रमाणपत्र दाखवून यांनी नोकरी मिळवली नसती तर गरीब होतकरु, दलित मुलगा किंवा मुलगी ती या पदावर बसली असती.
नावाचा खेळ केलाय. दाऊद वानखेडे की ज्ञानदेव वानखेडे?, यास्मिन की जस्मीन?, काशीफ खान की काशीफ मलिक खान? या चित्रपटामध्ये नावांचा खेळही फार मोठा आहे. मात्र नाव बदलून तो मी नव्हे असं सांगून चालणार नाही,” अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
समीर वानखेडे अनेक नेत्यांना भेटत असल्याच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारण्यात आला असता, “नेत्यांना भेटले तो त्यांचा अधिकार आहे,” असं मलिक म्हणाले. ” या पूर्वीही ते अनेक नेत्यांना, दलित नेत्यांना भेटले आहेत. आठवले साहेब त्यांच्यासोबत आहेत. ते दलितांचा हक्क हिरावून घेत आहेत आणि दलित नेते त्यांच्यासोबत आहेत याहून दूर्देवी काही असू शकत नाही,” असं मलिक यांनी म्हटलं आहे.
तसेच पुढे बोलताना, “लोक, माझ्या जवळची लोक मला हे बोलले. त्याला (शाहरुखला) धमकावण्यात आलं की नवाब मलिकला थांबवं. माझा एक मुलगा वकील आहे. काही वकील त्याला ब्रेन वॉश करत होते. तो घरी येऊन मला सांगयचा की बाबा हे पुरे करा. मोठा मुलगाही हेच सांगत होता. पण कोणी धमकावल्याने मी घाबरणाऱ्यांमधला नाहीय,”: असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
“काही लोक हे सुद्धा सांगत होते की ड्रग्जची प्रकरण मोठी असतात, यात फार पैसा अडकलेला असतो. तुमच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण मी आधीच सांगितलेलं की मी हे लॉजिकल एण्डपर्यंत घेऊन जाणार. कोणी हे म्हणत असेल की नवाब मलिकला मारुन टाकू तर ज्या दिवशी मला मरायचंय त्या दिवशी मी मरणार,” असं धमक्यांबद्दल बोलताना मलिक यांनी म्हटलं आहे.
“पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही. मी विधानसभेमध्ये जे प्रकरण समोर आणणार आहे त्यानंतर भाजपा कार्यकर्ते जनतेसमोर जाऊ शकणार नाही हे मी आज पुन्हा एकदा सांगतो,” असंही मलिक यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply