झारखंडमधील भाजप मीडिया प्रभारी यांच्यावर आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूच्या लैंगिक शोषणाचे आरोप

राची : २८ ऑक्टोबर – झारखंडमधील भाजपचे मीडिया प्रभारी संजय मिश्रांवर एका आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूने लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. यावरून कारवाई करत चक्रधरपूर पोलिसांनी मिश्रांना तातडीने ताब्यात घेतले आहे.
संबंधित पीडित महिला खेळाडूने सोमवारी चक्रधरपूर पोलीस ठाण्यात संजय मिश्रांविरोधात तक्रार दाखल करत चाईबासा कोर्टात जबाबही नोंदविला. संजय मिश्रांनी चक्रधरपूरमधील नामांकित हॉटेलमध्ये लैंगिक शोषण केल्याचा आरोप या खेळाडूने केला आहे.
एप्रिल २०२१ पासून मिश्रा आपल्याला ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप या खेळाडूने केला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संजय मिश्रांना ताब्यात घेततले. यानंतर प्रभारी एसडीपीओ दिलीप खलखो यांनी मिश्रा आणि पीडितेची चौकशी केली. यानंतर मिश्रांची रवानगी कारागृहात करण्यात आली.
पीडितेच्या आरोपांवरून संजय मिश्रांची चौकशी केली जात असल्याचे एसपी अजय लिंडा यांनी सांगितले. यानंतर पोलीस पुढील कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले. एफआयआरनुसार संजय मिश्रांनी महिला खेळाडूचा आक्षेपार्ह फोटो काढला होता. हा फोटो दाखवून तो महिलेला ब्लॅकमेल करत होता. मिश्रा हॉटेलमधून बोलवून लैंगिक शोषण करायचा असे या खेळाडूने तक्रारीत म्हटले आहे.
याची माहिती संजय मिश्रांच्या पत्नीलाही मिळाली होती. त्यामुळे त्यांच्यातही वारंवार भांडण होत असल्याची माहिती आता समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी संजय मिश्रांच्या पत्नीने रेल्वे स्टेशनवरच त्यांच्यासोबत भांडण केले होते. दरम्यान, पोलिसांनी याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांनाही दिली आहे.

Leave a Reply