देशी गाईंच्या संवर्धनासाठी ग्रामायणने बाजारात आणले तीन गोमय गिफ्ट हॅम्पर

नागपूर : २८ ऑक्टोबर – देशी गाय वाचविणे आणि शेतकरी आत्मनिर्भर होऊन त्याला समृद्धी मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी गोमय गाईचे प्रमुख उत्पादन समजून गोमय आधारित उद्योग करावे. याकरिता ग्रामायणने यंदा तीन गोमय गिफ्ट हॅम्पर बाजारात आणले आहेत, अशी माहिती ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे आणि निसर्ग विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय घुगे यांनी पत्रपरिषदेत दिली.
यावर्षी २३ वस्तू गोमयापासून शेतकरी-महिलांनी प्रशिक्षित होऊन तयार केल्या आहेत. याचे कामधेनू, सुरभी आणि नंदिनी, असे तीन गिफ्ट हॅम्पर तयार केले आहेत. गो आधारित या वस्तूंच्या वापरामुळे पर्यावरणपूरक दिवाळीचा आनंदही आपण घेणार आहोत. कामधेनूमध्ये १६ गोमय वस्तू आहेत तर सुरभीमध्ये ११ आणि नंदिनीमध्ये ६ वस्तू आहेत. सर्व वस्तू उत्तमप्रकारे पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत. यंदा हॅम्पर किंवा सुट्या वस्तूही आपण विकत घेऊन आपण भेट दिल्या पाहिजे, देऊ शकतो हे समाजातल्या प्रतिष्ठितांच्या मनात ठसावे म्हणून मुद्दाम तीन गिफ्ट हॅम्पर तयार केले आहेत. विदर्भात गोमयाच्या वस्तू लोकांना सहज व घरपोच उपलब्ध व्हाव्या म्हणून यंदा अनेक तरुण विक्री कामात कार्यरत झाले आहे. तसेच पूर्ती, डीबी मार्ट या व इतर अनेक मॉलमध्ये ही उपलब्ध केल्या आहेत, असे डॉ. घुगे यांनी सांगितले. गोमयापासून वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण, मार्गदर्शन मशिन व कच्चा माल पुरविण्याचे काम ग्रामायण करणार आहे. लवकरच यासाठी मोठय़ा प्रमाणात गोमय शेण व गोमुत्र खरेदी केंद्रे सुरू करण्याचा विचार आहे. युवकांनी शेतकर्यांची मुले, महिलांनी गोमय उद्योगात उतरावे, ग्रामायण त्यांना सर्वप्रकारे मदत करेल, असे आवाहन अनिल सांबरे यांनी केले. गाईपासून शेणगोमय, गोमूत्र हे मुख्य उत्पादन समुपन शेतकर्यांच्या दुधाला दुय्यम उत्पादन बाय प्रोडक्ट समजले तर शेतकर्यांच्या व देशी गाईच्या समस्या दूर होतील, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी ग्रामायण गोमय कौशल्य विकास केंद्राचे प्रशांत बुजोणे, नंदिनी गोशालेचे नरेश लालवाणी, गोमय वस्तू मार्केटिंग प्रमुख शैलेश अग्निहोत्री आणि अंधविद्यालय संस्थेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे उपस्थित होते.
समाजात सकारात्मक दृष्टीने अनेक संस्था, व्यक्ती कार्य करीत असतात, त्या संस्थांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने ग्रामायण प्रतिष्ठान कार्यरत आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकर्यांचा मूलभूत आधार शेती व गोसंवर्धन हा असतो. शेतीला जोडधंद्याची जोड आणि गोसंवर्धनात गाईच्या शेणाचे मूल्यवर्धन व्हावे, या दृष्टीने कार्य करण्याचा संस्थेचा निर्धार आहे. पहिली गोमय समृद्धी कार्यशाळा देवलापार येथे घेण्यात आली. ग्रामायण प्रतिष्ठानने गोमय समृद्धी वर्कशॉपचे अनेकवेळा आयोजित केले. मागील दिवाळीत कामधेनू गिफ्ट हॅम्परचा यशस्वी प्रयोग केला.

Leave a Reply