दिवाळीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : २७ ऑक्टोबर – माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत गायक सोनू निगमदेखील गाणार आहे.
अमृता यांनी ट्विटरवर गाण्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. तसंच, या पोस्ट शेअर करत त्यांनी या गाण्यात सोनू निगम असल्याचीही माहिती दिली आहे. दिवाळीत अमृता फडणवीस यांचं हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता फडणवीस यांच्यासोबत सोनू निगमसुद्धा दिसणार असल्यानं चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
ओम जय लक्ष्मी माता असं गाण्याचं शीर्षक आहे. हे गाणं म्हणजे महालक्ष्मीची आरती असून अमृता यांनी ट्विटरवर या गाण्याचे पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अमृता यांच्यासोबत सोनू निगमसुद्धा दिसत आहे. तसंच, अमृता यांनी शेअर पोस्ट केलेल्या ट्वीटमध्ये गाण्याचे बोलदेखील लिहलं आहे.
दरम्यान, गणेशोत्सव काळातही अमृता यांनी एक गाणं चाहत्याच्या भेटीसाठी आणलं होतं. गणेश वंदना असं या गाण्याचं नाव होतं. तर, या गाण्यातून एक सामाजिक संदेशही देण्यात आला होता. भक्तीचे दुसरे नाव सेवा, असा सकारात्मक संदेश गाण्यातून देण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांनी कुटुंबातील प्रमुख स्त्रीची भूमिका साकारली होती. त्यामुळं आता या नवीन गाण्यातून अमृता फडणवीस कोणता सामाजिक संदेश देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply