विनोद शिवकुमारचा जामीन फेटाळला

अमरावती : २४ एप्रिल – हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा जामीन अर्ज शुक्रवारी अचलपूर येथील पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. के. मुंगीनवार यांच्या न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्याला अजूनही पुढील आदेशापर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

विनोद शिवकुमार याला जामीन मिळावा यासाठी वकिलांतर्फे अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर गुरुवारी दोन्ही पक्षांच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी जामीन अर्जावर निर्णय दिला. शिवकुमार हा गुगामल वन्यजीव विभागात वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत होता. पळून जाताना त्याला अटक करण्यात आली. इतर साक्षिदारांवर तो दबाव आणू शकतो आणि पळून जाण्याची शक्यताही न्यायालयाने वर्तविली. त्यावरून जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी वरिष्ठ अधिकार्‍याच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकरणाला विनोद शिवकुमार हा जबाबदार असल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी नमूद केल्याने विनोद शिवकुमारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो नागपूर रेल्वे स्टेशनहून पळून जात असताना त्याला अटक करण्यात आली होती. विनोद शिवकुमार अमरावती जिल्हा कारागृहाच्या क्वॉरंनटाईन सेंटरमध्ये आहे. कोरोना काळात 15 दिवसांपेक्षा अधिक काळ संपला आहे. आता तर त्याचा जामीन देखील फेटाळण्यात आला. त्यामुळे त्याला आता थेट कारागृहात पाठविण्याची मागणी होऊ लागली आहे.
विनोद शिवकुमार याच्या चालकाचे बयाण न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरले आहे. शिवकुमार साक्षीदारांना सहज त्रास देऊ शकतो. चालकाच्या बयाणावरून हे उघड झाले आहे. घटनेनंतर विनोद शिवकुमार सरकारी वाहनातून परतवाडा येथे आला. त्याने त्या चालकाला त्याचा मोबाईल बंद करण्यास सांगितले. त्यानंतर नागपूर विमानतळावर जाण्यासाठी खासगी वाहन भाड्याने घेतले. विमानतळावर जाण्या ऐवजी तो नागपूर रेल्वे स्थानकात गेला. त्याने चालकाला रेल्वेचे तिकीट काढण्यास सांगितले. रेल्वे तिकीट मिळाल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply