मुंबई : २५ ऑक्टोबर – एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी फ्रॉड केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांचे आरोप वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांनी या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे समीर वानखेडे हे आता मलिक यांना कोर्टात खेचणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा जन्म दाखला ट्विट करून इथूनच फ्रॉड सुरू झाल्याचं म्हटलं आहे. समीर वानखेडे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याविरोधात खोडसाळ आरोप केले जात असल्याचं सांगत त्याला कायदेशीर उत्तर देणार असल्याचं वानखेडे यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणी ते सेशन कोर्टातही रवाना झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडेंबाबत अनेक माहिती पुढे येत आहे. तसेच त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून आरोपही केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर वानखेडे आणि एनसीबीचे विशेष सरकारी वकील यांच्या चर्चा झाली. विशेष सरकारी वकील यांच्या दालनात चर्चा होती. गुन्हा क्रमांक ९४/२१ बाबत ही चर्चा सुरू होती. या गुन्ह्या बाबत समाज माध्यमावर सतत चर्चा सुरू आहे. अनेक पंचांची नाव उघड होत आहेत, एनसीबी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप होत आहे, या पार्श्वभूमीवर कोर्टाला काय माहिती द्यायची याबाबत चर्चा सुरू होती. या गुन्ह्याबाबत सोशल मीडियावर आणि ज्या काही तक्रारी होत आहेत, त्याचा परिणाम या गुन्ह्याच्या तपासावर होऊ नये, कारवाईवरही परिणाम होऊ नये, याबाबत चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर एक सविस्तर निवेदन विशेष एनडीपीएस कोर्टात सादर केलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली