आता इंटरव्हलनंतर बाकीचा स्क्रीनप्ले मी सांगणार – संजय राऊत

मुंबई : २५ ऑक्टोबर – आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी आठ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक आरोप या प्रकरणातील पहिले साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केला आहे. या सगळ्या प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसंच, नवाब मलिकांनी या प्रकरणात आतापर्यंत बोलत होते. आता इंटरव्हलनंतरचा स्क्रीनप्ले मी सांगणार आहे, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
‘हा मनी लाँड्रिगचा प्रकार आहे. मी जो व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओतील काळ्या कपड्यातील व्यक्ती सॅम डिसोझा आहे, तो मनी लाँड्रिग खेळातील मोठा खेळाडू आहे. हा खूप मोठा खेळ असून तो आता खेळ सुरु झाला आहे. या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्याने जो खुलासा केलाय. त्यामुळं देशावर मोठे उपकार झाले आहेत. ही मोठी राष्ट्रभक्ती आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईत नव्हे तर दिल्लीपर्यंत आहेत. प्रभाकर साईलने मोठे धाडस केले आहे. त्याने देशावर उपकार केले आहेत. मी त्याच्या धाडसाचे कौतुक तरतो. हीच खरी देशभक्ती आहे. आता अनेक गोष्टी बाहेर येतील. मलिक यांनी काही गोष्टी बाहेर आणल्या. आता इंटरव्हलनंतर बाकीचा स्क्रीनप्ले मी सांगणार,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भाजपनं या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यावरही संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. सीबीआयची चौकशी व्हावी. जरुर व्हावी. सीबीआय तुमच्या खिशात आहे ना? तुम्हीही अनेक व्हिडीओ बाहेर आणले. पण तुमच्या काळजाला वार झाला. तुम्ही म्हणताय ना चौकशी करा… करा. अजून दहा व्हिडीओ मी तुम्हाला देतो, करा चौकशी,’ असं राऊतांनी म्हटलं आहे.
‘किरण गोसावी कुठाय हे भाजपला माहिती असेल. परमबीर सिंग कुठेय हेही त्यांना माहिती असेल. कारण महाराष्ट्राला बदनाम करण्याची यांनी एकही संधी सोडली नाहीये,’ असा आरोपही राऊतांनी केला आहे.

Leave a Reply