संपादकीय संवाद – समीर वानखेडेंवर बेछूट आरोप करणे आतातरी थांबवावे

सध्या महाराष्ट्रातल्या महाआघाडी सरकारमधील दिग्गज नेते एकाच व्यक्तीवर निशाणा साधण्यात व्यस्त आहेत, ती व्यक्ती म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबईतील वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे. त्यांच्यावर टीका करताना नवाब मलिक, सचिन सावंत, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत हे थकतच नाहीत, त्यांचाच नाही तर त्यांच्या ४२ पिढ्यांचा खरा खोटा इतिहास समोर आणण्यात हे धन्यता मनात आहेत.
या समीर वानखेडेंचा गुन्हा एकच, त्यांनी ड्र्ग्सचे एक रॅकेट शोधले एका क्रूझवर सुरु असलेल्या पार्टीवर त्यांनी धाड टाकली, त्यात बॉलिवुडमधला एक सितारा शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान हा सापडला, आणि त्याला जमीन मिळू शकलेला नाही. त्यामुळे हे सर्वच संतापलेले आहेत, आणि समीर वानखेडेंवर खरेखोटे आरोप त्यांनी सुरु केले आहेत.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे एनसीबी ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्था आहे, त्यामुळे इथे राज्य सरकारचा काही दबाव चालत नाही. ही बाब लक्षात घेत महाआघाडीतले नेते अस्वस्थ झाले आहेत, त्यामुळे आता त्यांचा नारायण राणे करावा, अश्या प्रयत्नात हे सर्व नेते सक्रिय झाले आहेत. त्यांच्या विरोधात वेगवेगळे आरोप केले जात आहेत, त्यातील काही फौजदारी स्वरूपाचे आरोपसुद्धा आहेत. अश्याच काही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करायचा आणि त्यांना मुंबई पोलिसांकडून अटक करवायची, असा या दिग्गजांचा डाव असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार बघता पुन्हा एकदा केंद्राला ललकरण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसते आहे.
नवाब मलिक यांनी तर समीर वानखेडे यांना वर्षाच्या आत नोकरीतून काढून टाकण्याची धमकी दिली आहे, त्याचबरोबर त्यांना तुरुंगातही बसवून असे सांगून मोकळे झाले आहेत. एकूणच सर्वच टप्प्यांवर अतिरेक सुरु असल्याचे दिसून येते.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे इथे परदेशातून बेकायदेशीर गोष्टी बऱ्याच येतात, त्यात अमली पदार्थांचाही समावेश आहे. गर्द, कोकेन, ड्रग्स असे प्रकार परदेशातून भारतात आणले जातात, आजच्या तरुणाईला याची सवय लावून नशाबाज बनवले जाते, असे नशाबाज बनवून तरुणाईला लुटलेही जाते आणि बार्बाडाही केले जाते, एकूणच या देशातील भावी पिढीला बरबाद करण्याचा हा परदेशी शक्तींचा डाव आहे, तो उधळून लावण्यासाठी समीर वानखेडेंनी पाऊले उचलली आहेत. इथेच या महाआघाडीतील दिग्गजांचे पुन्हा पोटशूळ उठला आहे. या गर्द पुरवणाऱ्या मंडळींशी या मंडळींचे काय हितसंबंध गुंतले आहेत, याची कल्पना नाही, पण या मंडळींसाठी समीर वानखेडेंना बदनाम करायचे असा या दिग्गजांनी चंगच बांधला आहे.
वस्तुतः समीर वानखेडे तरुणाईला व्यसनापासून वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे या राजकीय नेत्यांनी खरेतर त्यांचे कौतुक करायला हवे, मात्र तसे न करता त्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न का? हे कोडे काही उलगडत नाही. जर समीर वानखेडेंनी यात काही गैरप्रकार केले असतील, तर न्यायालयासमोर ते आणता येतील, त्यात समीर वानखेडे दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईदेखील होईल, मात्र दररोज माध्यमांसमोर येऊन वानखेडेंविरुद्ध टीकास्त्र सोडल्याने या प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटण्यास काहीही मदत होणार नाही, हे या आरोपकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. आजवर आपल्या देशातील तपास यंत्रणांवर जनसामान्यांचा विश्वास कायम राहिला आहे, या राजकीय नेत्यांच्या अश्या आरोपसत्रांमुळे या तपास यंत्रणांवरील जनसामान्यांचा विश्वास डळमळीत होऊ शकतो, ही भीती लक्षात घ्यायला हवी. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन समीर वानखेडेंवर असे बेछूट आरोप करणे आतातरी थांबवायला हवे.

अविनाश पाठक

Leave a Reply