बॅालिवुडमध्ये नशा करण्याचे विनाशकारी तंत्र सुरू – बाबा रामदेव

नागपूर : २४ ऑक्टोबर – बॅालिवुडमध्ये नशा करण्याचे विनाशकारी तंत्र सुरू आहे. हे भावी पिढीसाठी धोकादायक आहे. सर्व इंडस्ट्रीने मिळून आपला कचरा साफ करायला हवा. ड्रग्ज त्यांच्यासाठीच आत्मघातकी आणि धोकादायक असेल, असे प्रतिपादन हरिद्वार येथील पतंजली योगपीठाचे संस्थापक योगगुरू बाबा रामदेव यांनी केले.
रविवारी आयोजित एक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी शनिवारी रात्री रामदेवबाबा यांचे नागपुरात आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केले. पेट्रोल-डिझेल दरवाढीवर बोलताना त्यांनी भविष्यात इंधनाचे भाव कमी होतील, असा आशावाद व्यक्त केला. जर कच्च्या तेलाच्या किमतीच्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल विकले गेले तर दोन्ही स्वस्त होतील. पण, इंधनांवर टॅक्स लावला जातो. सरकार तसेच देशाची अर्थव्यवस्था चालविण्यासाठी हे आवश्यक आहे. यामुळेच सरकारला टॅक्स हटविणे अशक्य होत आहे. मात्र, कधी ना कधी हा टॅक्स नक्कीच हटेल. सध्याच्या स्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचाच सामना होणे भारताच्या हिताच्या विरुद्ध आहे. एकीकडे आतंकी खेळ आणि दुसरीकडे क्रिकेटचा खेळ सुरू आहे. या दोन्ही गोष्टी सोबत चालू शकत नाहीत, असे रामदेव बाबा यांनी नमूद केले. योग आणि आयुर्वेदाचे महत्त्व त्यांनी पटवून सांगितले. अँलोपॅथीच्या तुलनेत योग आणि आयुर्वेद आताही सर्वश्रेष्ठ आहे. एर्मजन्सी उपाय आणि ऑपरेशन सोडल्यास ९८ टक्के आजाराचे समाधान आयुर्वेदात आहे. मिहानमधील पतंजलीचा प्रकल्प याचवर्षी सुरू व्हावा यासाठी आम्ही वेगाने काम करतोय. आमचे स्वप्न याचवर्षी साकार होणार आहे. आपण सर्वजण एकाच पूर्वजांची संतान आहोत. अध्यात्मिक राष्ट्रवादाला घेऊन देश वाटचाल करीत राहिला तर भारत जगाचे नेतृत्व निश्चितच करू शकेल, असेही रामदेवबाबा यांनी नमूद केले.

Leave a Reply