श्री राजेंद्र हायस्कूल येथे पोलिस हुतात्मा दिन साजरा

नागपूर : २२ ऑक्टोबर – आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ २१ ऑक्टोबर रोजी श्री राजेंद्र हायस्कूल व जुनियर कॉलेज, कोठी रोड, महाल, नागपूर येथे पोलिस हुतात्मा दिन साजरा करण्यात आला.
या दिवसाच्या निमित्ताने शाळेचे माजी विद्यार्थी लान्स नायक शहीद श्री सुनील सनेश्वर यांच्या शिलाचित्रास माल्यार्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक (सीमा सुरक्षा दल) श्री सुनील कुमार तसेच कोतवाली पोलिस स्टेशन येथील कॉन्स्टेबल अरविंद पवार या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी दि. एम. पी. एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री मोहन नहातकर त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निता जाधव, उपमुख्याध्यापक विवेक घावडे, पर्यवेक्षिका रंजना चौधरी, शिक्षक प्रतिनिधी प्रतिभा ढेंगे यांच्या हस्ते शहीद सुनील सनेश्वर यांच्या परिवारातील सदस्य श्री अनिल व सुधीर सनेश्वर (सुनील यांचे बंधू) तसेच बहीण इंदुताई व परिवारातील इतर सदस्य यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक शिक्षिका विश्रांती लोखंडे यांनी सनेश्वर यांच्या युद्धजन्य परिस्थितीतील उल्लेखनीय कामगिरी वर प्रकाश टाकला. तसेच त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी स्वतःला वाहून घ्यावे असे आवाहन केले. देशासाठी सर्वोच्च बलिदान देऊन अमर झालेले श्री सनेश्वर यांना सचिव मोहन नहातकर व सुनील कुमार यांनी आपल्या भाषणातून आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे संचालन स्वाती श्रीखंडे व आभार प्रदर्शन कल्पना गाडगे यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत, सर्व कोरोना नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply