वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

यवतमाळ : २२ ऑक्टोबर – पांढरकवडा वनपरिक्षेत्रांतर्गत वांजरी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गुलाब कवडू कुंचलवार (वय ४७) या गुराख्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काल रात्री २ वाजता शव सापडले. पांढरकवडा वनपरिक्षेत्रांतर्गत सुन्ना बिटातील वांजरी शिवारात गुरांच्या शोधात जंगलात एकटा गेलेल्या गुराखी गुलाब कुंचलवार याच्यावर वाघाने हल्ला करून त्याचा बळी घेतला. गुलाब राखत असलेली गुरे एका शेतात घुसल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. यावरून दोघांत वाद झाला व त्या शेतकऱ्याने गुरांना कोंडवाड्यात टाकण्यासाठी नेले. यात गावकऱ्यांनी मध्यस्थी करून गुरांना कोंडवाड्यात टाकण्यापासून थांबविले.
यात काही गुरे भरकटली. त्यांना शोधण्यासाठी गुलाब जंगलात एकटाच गेला परंतु उशिरापर्यंत तो घरी न आल्याने गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले असता वनकर्मचारी तत्काळ गावात पोहचले. वनकर्मचारी, पोलिस व गावकऱ्यांच्या मदतीने रात्रभर जंगल पिंजून काढले. रात्री २ च्या सुमारास गुलाबचे शर्ट दिसून आले तर काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळला. घटनास्थळाच्या पाहणीवरून व शरीरावरील खुणांवरून गुलाबचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले. सकाळी उपवनसंरक्षण किरण जगताप यांनी गुलाब कुंचलवारच्या परिवाराची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले व त्यांना शासन निर्णयानुसार मिळणाऱ्या मोबदल्याची माहिती दिली. या घटनेचा राजकीय फायदा घण्यासाठी काही राजकारण्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठविले त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला.

Leave a Reply