बिबट्याच्या अंगावर झडप घेत मातेने वाचवले ६ वर्षीय मुलाचे प्राण

नाशिक : २१ ऑक्टोबर – गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ले वाढले आहे. इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथे सोमवारी बिबट्याने एका दहा वर्षीय मुलाचा बळी घेतला होता. या घटनेनं इगतपुरी परिसरात भीतीचं वातावरण असताना आता, काल (बुधवार) फोडशेवाडी येथील एका सहा वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पण संबंधित मुलाच्या आईने आपल्या जीवाची पर्वा न करता, बिबट्याच्या अंगावरच झेप घेत, पोटच्या गोळ्याची मृत्यूच्या जबड्यातून सुटका केली आहे.
यामुळे संबंधित मुलाचा प्राण वाचला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आईनं केलेल्या धाडसाचं गावात कौतुक होतं आहे. कार्तिक काळू घारे असं बिबट्याने हल्ला केलेल्या मुलाचं नाव आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहेत. कार्तिकची प्रकृती सध्या स्थिर असून त्यामध्ये सुधारणा होतं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. विशेष म्हणजे याच बिबट्याने सोमवारी दरेवाडी येथील एका दहा वर्षीय मुलाचा बळी घेतल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.
खरंतर, गेल्या काही दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात सहा ते अकरा वयोगटातील मुलंच जास्त जखमी होतं आहेत. बिबट्या हा आपल्या उंचीइतक्या व्यक्तींवरच हल्ला करतो, हे त्यामागील कारण असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच इगतपुरी परिसरातील बराच भाग हा घनदाट जंगलाचा आणि धरण क्षेत्राचा आहे. त्यामुळे याठिकाणी बिबट्याचा वावर देखील जास्त असल्याची माहिती फोडशेवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य डी जी घारे यांनी दिव्य मराठीला दिली आहे.
गेल्या दोन वर्षांत इगतपुरी परिसरात बिबट्याने अनेकांवर हल्ला केला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात गेल्या दोन वर्षात येथील सात जणांनी आपला प्राण गमवला आहे. तर अनेकजण जमखी झाले आहेत. दरम्यानच्या कालावधीत वन विभागाने इगतपुरी परिसरातून आतापर्यंत दहा बिबट्यांना जेरबंद केलं आहे.

Leave a Reply