राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड

मुंबई : २० ऑक्टोबर – राज्य महिला आयोगाला अखेर दीड वर्षानंतर अध्यक्ष मिळाला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. निवडीबाबतचं पत्र रुपाली चाकणकर यांना आज मिळालं. चाकणकर या अध्यक्षपदाची जबाबदारी उद्या स्वीकारणार आहेत.
४ फेब्रुवारी २०२० रोजी विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पासून हे पद रिक्त होतं. राज्यात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशावेळी भाजप आणि अन्य विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला जात होता. महिला सुरक्षेबाबत हे सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला जात होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे राज्य सरकारवर अनेकदा टीकास्त्र डागलं आहे. अशावेळी अखेर ठाकरे सरकारनं रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड केली आहे.
विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. आयोगाचे अध्यक्षपद हे राजकीय स्वरुपाचे नसल्याचं सिद्ध झालं आहे. हा माझ्या अराजकीय भूमिकेचा नैतिक विजय आहे, त्यामुळे आता हे पद स्वतःहून सोडण्याचा निर्णय घेतल्याचं विजया रहाटकर यांनी पत्रात म्हटलं होतं.

Leave a Reply