स्वच्छतेच्या बाबतीत चंद्रपूर शहर महानगरपालिका पहिल्या तीनमध्ये ही गौरवाची बाब – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : २० ऑक्टोबर – स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर असून, राज्यातील २७ महानगरपालिकेत स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला असता, चंद्रपूर शहर महानगरपालिका पहिल्या तीनमध्ये समाविष्ट आहे, ही गौरवाची बाब असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख व माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणारी रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश, पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धेतील पारितोषिक आणि माझी वसुंधरा अभियानअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळा मनपाच्या राणी हिराई सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे समाजसेवक अनिकेत आमटे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे आदींची उपस्थिती होती.
आ. मुनगंटीवार म्हणाले, स्वच्छता अभियानामध्ये तालुकानिहाय, शहर व गावनिहाय झालेले काम व आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्हा राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर येईल. तसेच भविष्यात देशातसुद्धा चंद्रपूर जिल्हा अव्वल क्रमांकावर अवश्य येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी रमाई घरकुल योजनेचा उल्लेख करताना आ. मुनगंटीवार म्हणाले, अर्थमंत्री म्हणून माझ्या कारकिर्दीत मी घरांसाठी जास्त निधी उपलब्ध करायचो. तसेच मागील १० वर्षांत आपण रमाई घरकुल योजनेअंतर्गत ७५०० घरे मंजूर केल्याचा दाखलाही त्यांनी दिला. महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकारी यांनी रमाई योजनेत उत्कृष्ट काम केले. २०३५ मंजूर घरांपैकी उर्वरित ५०४ घरे १४ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावे, अशी सूचना त्यांनी केली.
राखी कंचर्लावार यांनी, चंद्रपूर शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक करण्यासाठी मनपा सातत्याने उपक्रम घेत आहे. यात आणखी भर घालण्यासाठी स्वच्छतादूत म्हणून अनिकेत आमटे यांची निवड करण्यात आली, ही चंद्रपूरसाठी गौरवाची बाब आहे. महानगरपालिका हद्दीत रमाई घरकुल योजनेमुळे अनेक गरीब कुटूंबाना हक्काचे घर उपलब्ध झाले. या योजनेतील निवडक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या धनादेश वितरित करण्यात आले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे नवनियुक्त स्वच्छतादूत (ब्रँड अँबेसेडर) व प्रसिद्ध समाजसेवक अनिकेत आमटे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात हा बहुमान व काम करण्याची संधी दिल्याबद्दल महापौर व अन्य पदाधिकार्यांचे आभार व्यक्त केले तसेच महानगरपालिकेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा मनोदय व्यक्त केला. तत्पूर्वी मनपाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह आणि बांबूची गणेशमूर्ती देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

Leave a Reply