कोण गरळ ओकतंय हे काल पंकजा मुंडेनी सांगितले – अरविंद सावंत

मुंबई : १७ ऑक्टोबर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणात ना विचार होता, ना विचारांचं सोनं, मुख्यमंत्र्यांनी काल केवळ गरळ ओकली, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीसांच्या या टीकेचा शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी जोरदार समाचार केला. कोण गरळ ओकतंय हे काल पंकजा मुंडे यांनीच सांगितलं आहे, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.
अरविंद सावंत यांनी मीडियाशी बोलताना हा टोला लगावला. यावेळी त्यानी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक मुद्याचं खंडन केलं. काल पंकजा मुंडे यांनी देखील भाजपला शालजोडीतून घराचा आहेर दिला आहे. रोज उठतात आणि सरकार पडलं असं म्हणतात. त्यामुळे कोण गरळ ओकत आहे ते पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे, असा चिमटा सावंत यांनी काढला.
त्यांना राज्याचं महत्त्व नाही
कालचं उद्धव ठाकरे यांचे भाषण अमृत मंथन करणार होतं. कालच उद्धव ठाकरे भाषण करताना म्हणाले, माझं भाषण संपताच यांचं चिरकणं सुरू होणार आहे. ज्यांच्या पोटात मळमळ आहे ते स्वतः गरळ ओकत आहेत. राज्यात जेव्हापासून सरकार आलं तेव्हापासून हे दोन दिवसात सरकार पडेल असे म्हणतात. त्यामुळे गरळ कोण ओकत आहे हे साऱ्यांना समजत आहे. त्यामुळे होळीच्या होळकरांना ना देशाचे महत्त्व आहे, ना राज्याचे महत्त्व आहे, असंही त्यांनी सांगितलं.
जे बाहेर पडलेत त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षातून हाकलेले आहे हे लक्षात ठेवा. ते एकमेव अंगार आहेत, बाकी सब भंगार है, अशा घोषणा ते पक्षात राहून देत होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना भंगारात काढलं. त्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीला शिवसेनाप्रमुख व्हायचे होतं. त्यासाठीची ती तडफडत होती. ती तडफड पूर्ण झाली नाही म्हणून ते बाहेर पडले. आता गर्व से कहो हम हिंदू है म्हणणारी माणसं कालपर्यंत त्यांना मराठी हृदयसम्राट अशी उपाधी लावत होते. त्यामुळे ती बिनबुडाची माणस आहेत. इव्हेंट मॅनेजर आहेत. आज तिकडं तर उद्या तिकडं असे इव्हेंट करत असतात. त्यामुळे त्यांना काही गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
आमचं हिंदुत्व कोणतं आहे हे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाच्या शेवटी सांगितलं. यापुढे आपण हिंदू म्हणून जगूयात आणि हिंदुस्थान हा माझा धर्म आहे असं समजून आपण वागले पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या त्या वागण्याचा अर्थ समजला पाहिजे. कारण गेली दोन वर्ष आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत देखील हीच भाषा वापरत आहेत. अजूनही त्यांना आपल्याच माणसाला समजवता येत नसेल तर ते इतरांना काय समजणार? असा सवालही त्यांनी केला.

Leave a Reply