पोलीस चौकीच्या आवारातच केला कुख्यात गुन्हेगाराचा खून

नागपूर : १७ ऑक्टोबर – नागपूर शहरात हत्या ही नित्यनियमाची बाब झाल्याचे चित्र आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरलाय की नाही, अशी विचारणा करण्यासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. हत्यांच्या याच शृंखलेत कळमना हद्दीत झालेल्या हत्येची भर पडली असून, ही हत्या पोलिस चौकीपुढे तेही भरदिवसा झाली आहे, हे विशेष. चेतन ठाकूर असे मृतकाचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, ज्याची हत्या करण्यात आली तो चेतन ठाकूर (वय २५, रा. कळमना) हादेखील गुन्हेगारीत लिप्त आहे. तर ज्यांनी हत्या केली त्यांची पार्श्वभूमीदेखील गुन्हेगारीचीच आहे. दीपेश पाचे असे हत्या करणार्या आरोपीचे नाव आहे. मृतक आणि हत्या करणारा आरोपी हे दोन्ही लुटमारीच्या घटनेत गंभीर दुखापत पोहोचविल्याप्रकरणी मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. मागील तीन महिन्यांपूर्वी मृतक चेतन ठाकूर याला जामीन मिळाल्यानंतर त्याची कारागृहातून सुटका झाली. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे व्यावसायिक त्रस्त झाले होते. हा प्रकार सुरू असताना दीपेश पाचे यालादेखील जामीन मिळाल्यानंतर तोदेखील कारागृहातून बाहेर पडला. दरम्यान, हत्येतील दुसरा आरोपी साहिल शहा हा आरोपीचा मित्र आहे. मृतक आणि आरोपी हे तिघेही अंमली पदार्थाच्या आहारी गेले होते. अशातच मद्यप्राशन करून ते कळमना पोलिस ठाणे हद्दीत धाक जमवित होते. दरम्यान, शुक्रवारी ते मंदधुंद अवस्थेत वंजारा पोलिस चौकीपुढे असलेल्या प्रतिभा लॉनसमोरील एका टपरीवर बसले होते. यावेळी दीपेशने मृतक चेतनला कारागृहातून जामिनावर सुटका करण्यासाठी का प्रयत्न केले नाही? अशी विचारणा केली. यातून त्यांचा वाद वाढला.
दीपेशने बाजूला पडलेला मोठा लाकडी दांडा चेतनच्या डोक्यावर हाणला. तर घटनेतील फरार असलेला आरोपी साहिलने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून चेतनला रक्ताच्या थारोळय़ात लोळविले.

Leave a Reply