आघाडी सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : १४ ऑक्टोबर – खासदार संभाजी छत्रपती मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा राज्यभर दौरे करणार आहेत. संभाजीराजेंच्या या निर्णयाचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं आहे. आघाडी सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही हे संभाजीराजेंनी लक्षात घ्यावं, असं सांगतानाच संभाजीराजेंनी या चळवळीचं नेतृत्व करावं असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. संभाजी छत्रपती यांनी घेतलेल्याल निर्णयाचं स्वागत करेन. अभिनंदन करण्याइतका मी मोठा नाही. संभाजीराजेंकडून फार मोठी अपेक्षा आहे. या चळवळीला कुणी तरी नेतृत्व देण्याची गरज आहे. ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं तेव्हा सर्व संघटना रणांगणात उतरल्या होत्या. भाजपही उतरली होती. मराठा आंदोलनात भाजप उतरली. पण भाजप राजकीय पक्ष असल्याने त्याला राजकीय रंग दिला गेला. मात्र, संभाजी राजे हे पक्षांच्यावर आहेत. त्यांनी नेतृत्व केलं तर या चळवळीला बळ येईल. हे सरकार नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. संभाजी राजेंनी हे लक्षात घ्यावं. सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. ते त्यांनी करावं, असं पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. नवाब मलिक यांनी एनसीबीवर जे काही आरोप केले त्यावर बोलायला मी काही अॅथोरिटी नाही. त्यांनी ज्यांच्याबद्दल म्हटलंय त्या यंत्रणेने उत्तर दिलं आहे. इतक्या मोठ्या यंत्रणेवर आघात केल्याने ती यंत्रणा रेग्यूलर प्रेस रिलीज काढतेय. आजच्या संदर्भातीही ते प्रेस रिलीज काढतील, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेवरही भाष्य केलं. शरद पवार आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर पहिल्यांदाच धाडी पडल्यात असं सांगितलं जातंय. इन्कम टॅक्सची धाड पडणं सीबीआयकडून चौकशी होणं हे कॉमन आहे. बाकीच्यांच्या ठिकाणी झालं तर चालतं. तुमच्यावर झालं तर सूड उगवण्याचा भाग आहे… अधिक वेळ थांबले… पाहुणे पाहुणाचार घेत आहेत… असं म्हणणं योग्य नाही. पण पवार ज्या यंत्रणांबाबत बोलले त्या यंत्रणांनी उत्तर द्यावं, असंही ते म्हणाले.

Leave a Reply