२५ ऑक्टोबरपासून मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा राज्यभर दौरा

कोल्हापूर : १३ ऑक्टोबर – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजी छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अल्टिमेटम देऊनही मराठा आरक्षणाबाबत या सरकारने काहीच केले नसल्याचं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. तसेच येत्या २५ ऑक्टोबरपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचंही संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.
खासदार संभाजी छत्रपती यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. येत्या २५ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी दौरा करणार आहे. रायगडपासून या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. राज्य सरकारने आश्वासन देऊनही काहीच केलं नाही. सारथीचा एक मुद्दा सोडला तर इतर मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले.
राज्य सरकार राज्याची जबाबदारी पाळत नाही. सरकारला अल्टिमेटम दिला होता. पण त्यांनी आश्वासन पाळलं नाही. आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही, आता आणखी काय चर्चा करायची?, असा उद्विग्न सवालही त्यांनी केला. तसेच कुणी टीका करतयं त्याकडे मी लक्ष देत नाही. टीकाकारांना विनंती आहे त्यांनी आपला वेळ समाजासाठी द्यावा, असं ते म्हणाले.
मराठा आरक्षणाची मशाल चुकीच्या व्यक्तीच्या हातात असल्याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी मतभेद असल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली. सातारा गादी आणि कोल्हापूरच्या गादीमध्ये कोणताही मतभेद नाही. उदयनराजे नेमकं काय म्हटले हे मला माहीत नाही, असंही ते म्हणाले.

Leave a Reply