प्रमुख पाहुण्यांशिवाय साजरा होणार यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक दलाचा विजयादशमी उत्सव

नागपूर : १३ ऑक्टोबर – कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यंदाचा विजयादशमी उत्सव कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करत केवळ २०० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत यंदाचा विजयादशमी उत्सव संपन्न होईल. यावर्षी कोणालाही प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आलेले नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला राजकीय आणि सामाजिक दृष्टीने फार महत्व आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे भाषण म्हणजे विजयादशमी उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. यावर्षी देखील कोरोना निर्बंध असल्याने संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात आलेला आहे.
दरवर्षी नागपुरातील रेशीमबाग मैदानावर विजयादशमी उत्सव सोहळ्याचं भव्य आयोजन संघातर्फे केलं जातं. मात्र, गर्दीमुळे कोरोनाच प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने यावर्षी केवळ २०० स्वयंसेवकांच्या उपस्थित विजयादशमी उत्सव साजरा केला जाणार आहे. यंदाचा कार्यक्रमाचे आयोजन मैदानामध्ये होणार नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात केले जाईल. या कार्यक्रमामध्ये मर्यादित स्वयंसेवकांची उपस्थिती राहणार असून सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे भाषण होणार आहे.
संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मार्गदर्शन करतात. त्याच्या भाषणातून वर्तमानातील राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर विषयांवर मार्मिक भाष्य केले जाते. या शिवाय भूतकाळात झालेल्या चुका, चांगल्या घटना यासह वर्षभरातील भावी योजना,नियोजन काय असेल हे देखील त्यांच्या भाषणातून स्पष्ट असल्याने स्वयंसेवकांचे त्यांच्या भाषणाकडे विशेष लक्ष लागले असते.

Leave a Reply