संपादकीय संवाद – अमिताभ बच्चन यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्हच

भारतीय चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलिवूडमध्ये महानायक म्हणून ओळखल्या गेलेल्या बिग बी अमिताभ बच्चनने वयाची ७९ वर्ष पूर्ण करून ८०व्या वर्षात पदार्पण करत असताना एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे, ती घोषणा अशी की यापुढे अमिताभजी पान मसाला व तत्सम जाहिरातीत दिसणार नाहीत. अमितजींची ही घोषणा फक्त स्वागतार्हच नाही तर इतर सेलिब्रेटींसाठी अनुकरणीय म्हणावी लागेल.
आपल्या समाजात जनसामान्यांमध्ये अनेक व्यसने रुजलेली आहेत, काही व्यसने पुराणकाळापासून आहेत तर काही आधुनिक काळात पाश्चिमात्त्यांकडून आलेली आहेत. त्यातील मदिरा म्हणजे आजची दारू ही प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे बोलले जाते, त्यानंतर तंबाखू सेवनाचाही नंबर लागतो. तंबाखूचा धूर तोंडावाटे छातीत भरून घेण्याची पद्धतही प्राचीनच म्हणावी लागेल, कारण मोगल बादशाहांच्या चित्रामध्ये हे बादशाह हुक्का ओढतांना दाखवले गेलेले आहेत. या प्राचीन व्यसनांव्यतिरिक्त आता बिडी, सिगारेट, गर्द, चरस, कोकेन, गांजा याचबरोबर पानमसाला, खर्रा, घुटका अशी विविध व्यसने प्रचलित आहेत. यातील काही व्यसनांना समाजमान्यता आणि राजमान्यताही मिळालेली आहे. त्यामुळे ही व्यसने सर्रास केली जातात. आज समाजात दारू पिणे किंवा सिगारेट ओढणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते, त्यामुळे व्यसन करणाऱ्याच्या शरीराची हानी तर होतेच, शिवाय आर्थिक फटकाही बसत असतो, या प्रकारात व्यसनकर्ता आणि त्याचा परिवार एकदमच बरबाद होत असतात.
वस्तुतः अश्या व्यसनी पदार्थांच्या उत्पादनांना परवानगीच दिली जाऊ नये, मात्र काही उत्पादनांना परवानगी तर दिली आहेच, त्याचबरोबर विक्री आणि जाहिरातींसाठीही परवानगी दिलेली आहे. पानमसाला हा त्यातलाच प्रकार आहे. इतरही अनेक उत्पादनांची जाहिरात आणि विक्री ही विविध वैध आणि अवैध मार्गांनी केली जात असते.
असे उत्पादन करणाऱ्या कंपन्या मोठमोठ्या जाहिराती देतात, होर्डिंग्स लावतात आणि धार्मिक कार्यक्रमात प्रयोजकत्वही घेतात. अश्या जाहिरातींमध्ये कधी अमिताभ बच्चन कधी गोविंदा, तर कधी शाहरुख खान असे गाजलेले चित्रपट अभिनेते झळकत असतात. आपल्याकडे तरुणाईला चित्रपट अभिनेत्यांची जबरदस्त क्रेज असते मग एखादे व्यसन करण्यासाठी एखादा अभिनेता सांगत असेल तर ते का करायचे नाही? असा विचार करून तरुणाई त्या व्यसनामागे लागते, मात्र ही व्यसने करून तरुणाई बरबाद होत असते, हा धोका लक्षात घेतला जात नाही. त्याचवेळी या तरुणाईच्या बर्बादीला जाहिरात फलकावर झळकलेला तो अभिनेता कुठेतरी जबाबदार असतो, हेही लक्षात घेतले जात नाही. वस्तुतः सुजाण आणि समंजस अभिनेत्यांनी जाहिरातीसाठी मिळणाऱ्या पैश्याचा मोह बाजूला ठेऊन अश्या जाहिराती नाकारायला हव्या, मात्र हा समंजसपणा आणि समाजभान कुणीही दाखवत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.
सुदैवाने आज अमिताभ बच्चन यांना हे समाजभान दाखवण्याची सुबुद्धी झाली आहे, हे स्वागतार्ह आहे. त्यामुळे अमिताभजी अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी दाखवलेला सुजाणपणा या देशातील जाहिरातींमध्ये झळकणाऱ्या सर्वच सेलिब्रेटी मंडळींनी दाखवायला हवा हेच पंचनामाचे त्यांना आवाहन आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply