गोंदियात महिलांनी मुजोर दारूविक्रेत्याला दिला चोप

गोंदिया : १२ ऑक्टोबर – नवरात्रौत्सवात गोंदिया येथे महिलांचा दुर्गावतार पहायला मिळाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील डव्वा गावात महिलांचा दुर्गा देवीचा अवतार पहायला मिळाला आहे. गावात दारू बंदी असतांना अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्याला जाब विचारायला गेलेल्या महिलांवर दारू विक्रेत्याने चाकू उगारला. यानंतर संतप्त झालेल्या महिलांनी दारू विक्रेत्याला चांगला चोप दिला. ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील डव्वा या गावात घडली आहे.
गावात दारूच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हेच लक्षात घेत डव्वा येथे महिलांनी दारू बंदी समिति स्थापन करून दारु विक्रिस विरोध करण्यास सुरुवात केली आहे. या समितिला डव्वा येथील बसस्टॉपच्या मागे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गावातील महिला घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी महिलांनी दारू विक्रेत्याला जाब विचारला असता दारू विक्रेत्यानी चाकू काढत शस्त्र दाखवून धाक दाखविन्याचा प्रयत्न केला.
मात्र चाकूच्या धाकाला महिला अजिबात घाबरल्या नाहीत. महिलांच्या अंगात जणु दुर्गा सरसावली असल्याचे दिसून आले आणि महिलांनी त्या दारू विक्रेत्याला चांगला चोप देत हुसकावून लावले. या घटने प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दारु विक्रेत्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave a Reply